बुलडाणा: कोरोना महामारीत आपल्या जीवाची पर्वा न करता सामना करणाऱ्या मोताळा तालुक्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी २१ सप्टेंबरला सरकारच्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या अभियानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला. याबाबतचे निवेदन त्यांनी एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांना सादर केले.
शासनाच्या मोहिमेला आमचा विरोध नाही. दररोज किमान ५० गृहभेटीमध्ये कुटंबातील प्रत्येक व्यक्तीची माहिती घेण्यात येणार आहे. त्यासाठी दररोज किमान १० ते १२ तास त्यांना लागणार आहे. शिवाय अधिक अंगणवाडीचे नियमित पोषण आहाराची कामे करण्यासाठी ४.३० तास असे मिळून १६ तास सेवा द्यावी लागणार आहे.
कोरोनाचे काम आणि नियमित पोषण आहाराचे काम हे करीत असतांना स्वतःच्या कुटुंबाकडे वेळ देण्यासाठी त्यांच्या कडे वेळच मिळणार नाही. या बदल्यात त्यांना कुठलाही अतिरिक्त मोबदला मिळणार नाही. यापूर्वी अंगणवाडी सेविकांनी हे काम केले आहे. परंतू सरकारने त्यांना त्याकामाचा मोबदला दिला नाही. अल्पमानधन आणि त्यात जर अतिरिक्त काम करावे लागत असेल तर हा त्यांच्यावर फार मोठा अन्याय आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संपर्क बालकांशी येतो. व गृहभेटी दरम्यान नागरिकांशी. यात कोरोेनाचा सर्वे करीत असतांना एखादी अंगणवाडीसेविका बाधित झाल्यास बालकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. याला जबाबदार कोण राहील असा प्रश्न अंगणवाडी सेविकांनी केला आहे. त्यामुळेच हे काम न करण्याचा निर्णय अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी शासनाला कळविला असून या मोहिमेत काम करण्यासाठी असमर्थता व्यक्त केली आहे.