मंगेश फरपट
व-हाड दुत न्युज नेटवर्क
बुलडाणा: कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात असला तरी लसीकरण मोहिमेचा व-हाडात फज्जा उडालेला दिसून येतो. आरोग्य यंत्रणा व लसीकरणाच्या ऑनलाईन सिस्टिमध्ये कुठलाही ताळमेळ नसल्याने हा गोंधळ उडाल्याचे शुक्रवारी अनेक लसीकरण केंद्रावर दिसून आले. विशेष म्हणजे अधिका-यांनीही तांत्रीक अडचण असल्याचे सांगत हात वर केले.
सरकारने जाहीर केल्याप्रमाणे 1 मे पासून 18 ते 44 वयोगटांतील व्यक्तींचे लसीकरण सुरू झाले . त्यासाठी कोविन अॅपवर नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे. सुरुवातीच्या पाच दिवसांत लशींचा साठा नसल्याने हे लसीकरण प्रत्यक्ष सुरू होऊ शकले नाही. शिवाय 45 वर्षांवरील व्यक्तींसाठीचे लसीकरणही लशींच्या साठ्याअभावी थंड बस्त्यात होते.
लसीकरणासाठी अॅपवर नोंदणीपासून केंद्रावर लसीचा डोज मिळेपर्यंत होणा-या
पद्धतीचा कमालीचा गोंधळ उडाला आहे. एकतर नोंदणी होत नाही, झाली तर वेळ व दिवसाचा स्लॉट मिळत नाही. स्लॉट मिळाला तरी डोज मिळत नाही. यासारख्या विविध अडचणी येत आहेत. शुक्रवारी तर अकोला, बुलडाणा जिल्ह्यात लसीकरणाच्या मोहिमेचा फज्जा उडालेला दिसून आला. खामगाव तालुक्यातील गणेशपूर व शेगाव शहरातील लसीकरण केंद्रावर लस उपलब्ध न झाल्याने गोंधळ पहावयास मिळाला.
शेगावात वैद्यकीय अधिक्षकांना घेराव
नागरिकांनी वैद्यकीय अधीक्षकांना घेराव घालत वाद केला. शेगावात मात्र आज नागरिकांच्या संतापाचा उद्रेक झाला. 45 वर्षावरील नागरिकांना दुसरा डोज मिळणार नसल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रेमचंद पंडित यांनी देताच नागरिकांचा संताप अनावर झाला. काही वेळाने नगरसेवक दिनेश शिंदे हे रुग्णालयात पोहचल्यानंतर नागरिकांनी रुग्णालय प्रशासनाच्या असुविधांचा पाढाच वाचला. यावेळी उडालेल्या गोंधळामुळे खाजगी सुरक्षारक्षकांसह पोलिसांनाही पाचारण करावे लागले. दुसरा डोज देणेबाबत वरिष्ठांच्या आदेशानंतरच लसीकरण सुरु होईल, असे रुग्णालय प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले. त्यामुळे अनेकांना लसीचा डोज घेतल्याविनाच परतावे लागले.
गणेशपूर केंद्रावर गोंधळ, वृद्धांना हेलपाटे!
खामगाव तालुक्यातील गणेशपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात आज 50 डोजचा साठा उपलब्ध झाला. प्रत्यक्षात 100 लोकांचे ऑनलाईन बुकिंग झाले. या केंद्रावर खामगाव, देऊळगाव राजा, मेहकर, चिखली, शेगाव, नांदुरा आदी ठिकाणाहून लोकांनी नोंदणी केली. त्यामुळे या केंद्रावर मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाल्याचे पहावयास मिळाले. या केंद्रावर दुपारी 3 वाजेनंतर 45 वर्षे वयोगटातील ज्या व्यक्तींना लस मिळू शकली नाही. यात बरेच वृद्धही होते. आरोग्य यंत्रणा व ऑनलाईन सिस्टीमच्या गोंधळात मात्र नाहक वृद्धांना त्रास झाला.
उपसंचालकांचे नियंत्रण सुटले!
अमरावती परिमंडळातील अकोला, बुलडाणा, वाशीम जिल्हयात लसीकरणाचा खोळंबा झाला आहे. अकोल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चौव्हाण यांच्याकडेच उपसंचालक पदाचा कार्यभार असल्याने कुठे कुठे लक्ष देवू अशी मनस्थिती झाली आहे. अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांचा कारभार पाहतांना उपसंचालकांना नाकेनऊ येत आहेत. कोरोना काळातही उपसंचालकांनी एकाही जिल्ह्यातील एकाही आरोग्य केंद्राला अद्याप भेट दिली नसल्याचे धक्कादायक वास्तव आहे. त्यामुळे लसीकरणातील घोळ थांबवण्यासाठी तरी साहेब बाहेर पडा आता असे म्हणण्याची वेळ आली आहे.
काय म्हणाले अधिकारी, कर्मचारी..
सरकारकडून सध्या 18 ते 45 वर्षे वयोगटातील व्यक्तींसाठीच लस साठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे इतरांना लस देता आली नाही. जिल्हयातील काही केंद्रावर गोंधळ उडाला पण त्यात आरोग्य यंत्रणेची चुक म्हणता येणार नाही. – डॉ. रविंद्र गोफणे, माता व बाल संगोपन अधिकारी, बुलडाणा.
———
जिल्हयावरून गणेशपूर केंद्राला फक्त 50 लसचे डोज उपलब्ध झाले होते. हे डोज दुपारपर्यंतच संपले. त्यामुळे दुपारी 3 ते 5 या वेळेत नागरिकांना लसीकरण करता आले नाही. – डहाके, आरोग्य सेवक, प्रा.आ.केंद्र, गणेशपूर
————-