व-हाड दूत न्युज नेटवर्क
अकोला: महिला आणि बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांनी सोमवारी अकोल्यातील भेटी दरम्यान पत्रकारांसोबत दादागिरी केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या प्रकाराने संतप्त होत पत्रकारांनी महिला व बालविकास मंत्री यशोमतीताई ठाकूर यांचा घटनास्थळावरच निषेध नोंदवत पत्रकार परिषदेवर बहिष्कार टाकला.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात महिला व बालविकास मंत्री यशोमतीताई ठाकूर यांची पत्रकार परिषद आज दुपारी 12.30 वाजता आयोजित केली होती. यासंदर्भात जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने यांनी निरोप दिला होता. पत्रकार परिषदेला बोलावल्यावरही वेळेवर तर यशोमतीताई आल्या नाही. पण जेव्हा 1.15 मि.नी. आल्या. तेव्हा पत्रकारांशीच दादागिरी करू लागल्या.
त्याचे झाले असे, जेव्हा यशोमतीताई आल्या. तेव्हा पत्रकारांनी एवढा उशिर झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. मात्र कोणतीही गोष्ट समजून घेण्याच्या मनस्थितीत नसलेल्या ताईंनी तोफबाजी सुरु केली. मला दुसरेही कामे असतात, मी अधिका-यांसोबत महत्वाच्या बैठकीत बसले होते असे उत्तर दिले. एवढ्यात हा सर्व प्रकार कॅमे-यात टिपत असलेले टीव्ही ९ चे प्रतिनिधी गणेश सोनोनेंचा कँमेराही त्यांनी हिसकावला. कॅमेरा हिसकावल्याचा प्रकार घडताच पत्रकार संतप्त होत बाहेर पडले. सदर घटनेनंतर पत्रकार संघटनांसह जिल्हाभरातील पत्रकारांनी घटनेचा निषेध नोंदवला.