वर्हाड दूत न्यूज नेटवर्क
चिखली : कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. रुग्णांना बेड मिळत नाही. रूग्ण व त्यांचे नातेवाईक बेडसाठी वणवण फिरत आहेत. त्यांना आधार मिळावा म्हणून आ. श्वेता महाले शहरात 50 खाटांचे कोविड रुग्णालय सुरू करणार आहे. त्यात मोफत उपचार मिळतील. त्यामुळे रूग्ण व नातेवाईकांना दिलासा मिळेल.
श्रीराम नागरी पतसंस्थेच्या जिजाऊ सभागृहात याबाबत बैठक झाली. आ. श्वेता महाले यांच्या पुढाकाराने सुरू होत असलेल्या आधार कोविड रुग्णालयबाबत नियोजन करण्यात आले. शहरासह ग्रामीण रूग्णांना तातडीने उपचार मिळावे यासाठी आधार बहुउद्देशीय संस्थेतर्फे सेवाभावी उपक्रम राबवला जाणार आहे. येथे उपचार मोफत होणार असून शासनाच्या प्रोटोकॉल प्रमाणे औषधी देण्यात येणार असल्याचे आ. महाले यांनी सांगितले. रुग्णालय उभारणीसाठी लागणारा निधी आ. महाले स्वत: उभारत असून रुग्णालयाला दैनंदिन औषधी, भोजन व अत्यावश्यक सेवेसाठी लागणारा निधी लोक सहभागातून उभा करण्यात येणार आहे. नागरिकांनी पुढे येण्याचे आवाहन आ. श्वेता महाले यांनी केले.
चिखली अर्बन बँकेचे अध्यक्ष सतीश गुप्त, डॉ. कृष्णकुमार सपकाळ, पंडितराव देशमुख, रामदास देव्हडे, सिंधू तायडे यांच्यासह नगरसेवक, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते. आ. महाले, रामदास देव्हडे यांनी मार्गदर्शन केले. रुग्णालयाचा शुभारंभ लवकरच होणार आहे.