वर्हाड दूत न्यूज नेटवर्क
अकोला:देशातील विविध भागात ऑक्सिजन पोहोचवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ऑक्सिजन एक्प्रेसची सेवा देशाच्या विविध भागात अविरत सुरु आहे. अकोला जिल्ह्यालाही या एक्स्प्रेसमुळे दिलासा मिळाला आहे. रुग्णांची गरज यामुळे पुर्ण होवू शकली अशी प्रतिक्रिया निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे यांनी दिली. जिल्ह्यातील काही रुग्णालयात वैद्यकीय ऑक्सिजन मिळाल्यामुळे प्रशासनाला तसेच रूग्णांना दिलासा मिळाला आहे.
अकोला जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, या कठीण काळामध्ये कुठेही ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होऊ नये या उद्देशाने विशाखापट्टणम वरून नागपूरला आलेल्या ऑक्सिजन एक्सप्रेस मधील एक टॅंकर अमरावती आणि अकोला जिल्ह्याला विभागून देण्यात आला आहे. सुमारे 10 मेट्रिक टन इतका ऑक्सिजनचा साठा प्राप्त झाला आहे. यापैकी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाला 6 मेट्रिक टन आणि उर्वरित 4 मेट्रिक टन साठा मुर्तीजापूर येथील शासकीय रुग्णालयाला देण्यात आला आहे. या ऑक्सिजन टँकरमुळे जिल्ह्याला दिलासा मिळाला असून, गरजू रूग्णांना ऑक्सिजन उपलब्ध करून देण्यासाठी मोठी मदत झाल्याची प्रतिक्रिया निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे यांनी दिली. जिल्ह्याची ऑक्सिजनची गरज पाहता पुण्यातून सुद्धा ऑक्सिजनचे टँकर मागवण्यात येत असल्याचं खडसे यांनी सांगितले. ऑक्सिजनच्या टंचाईला दूर करण्यासाठी देशभरात चालवण्यात येत असलेल्या ऑक्सिजन एक्प्रेसमुळे अनेक रुग्णांना दिलासा मिळत आहे. उपलब्ध असलेल्या विविध मार्गानी ऑक्सिजन पोहोचवण्याचं काम केंद्र सरकारकडून सुरु आहे.
खासदार धोत्रे यांनी मानले आभार
ऑक्सीजनचा तुटवडा निर्माण होवू नये यासाठी केंद्रीय राज्यमंत्री ना. संजय धोत्रे यांनी सातत्याने शासनाकडे पाठपुरावा केला. त्यामुळे ऑक्सीजन साठा उपलब्ध होवू शकला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑक्सिजनमुळे पुढील घटना घडू नये यासाठी प्राथमिक लक्ष केंद्रित केले आहे. केंद्रीय राज्यमंत्री ना. संजय धोत्रे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व रेल्वेमंत्री पियुष गोयल, ना. नितीन गडकरी यांचे आभार मानले आहे.