व-हाड दूत न्युज नेटवर्क
अकोला: दोन दिवसांपूर्वी अकोला पोलीस नियंत्रण कक्षात कार्यरत असलेले पोलीस निरिक्षक भीमराज घाडगे यांच्या तक्रारीवरून २८ एप्रिलरोजी रात्री २.३० वाजता येथील सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह 27 पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध अॅट्रॉसिटी अॅक्टसह विविध 22 कलमान्वये गुन्हे नोंदवण्यात आले. तत्काळ हे प्रकरण पुढील चौकशीसाठी ठाणे पोलिसांकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती सिटी कोतवालीचे ठाणेदार उत्तम जाधव यांनी दिली.
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी त्यांच्या कार्यकाळात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याची तक्रार घाडगे यांनी २० एप्रिल रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. या घटनेनंतर राज्यातील सहाय्यक पोलिस आयुक्त व पीआय दर्जाच्या काही अधिका-यांनी घाडगेंना जातीवाचक शिविगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी बुधवारी मध्यरात्री सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. परमबीर सिंग यांच्याविरोधात दाखल झालेला हा पहिला गुन्हा आहे.
या अधिका-यांनी केली शिविगाळ
परमबीर सिंग यांच्यासह 27 पोलिस अधिकाऱ्यांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप भीमराज घाडगे यांनी तक्रारीत केला आहे. यामध्ये पराग मनेरे, संजय शिंदे, सुनील भारद्वाज, विजय फुलकर या चार पोलीस उपायुक्तांसह इतर अधिका-याचंा समावेश आहे.
परमबीर सिंग यांच्यावर नेमका आरोप काय?
परमबीर सिंग यांच्या पत्नी यांचं इंडिया बुल्समध्ये कार्यालय आहे. तिथे हजारो कोटी गुंतवल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच त्यांचा मुलगा रोहन हा सिंगापूरमध्ये एक मोठा व्यवसाय चालवतो. तिथे देखील भ्रष्टाचाराचे पैसे गुतंवण्यात आले आहेत, असा आरोप भीमराज घाडगे यांनी केला आहे. परमबीर सिंग यांनी ठाण्याचे पोलीस आयुक्त असताना हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला. त्या रकमेची वेगवेगळ्या माध्यमातून गुंतवणूक केली. परमबीर सिंग यांच्या कुटुंबियांनी वेगवेगळ्या व्यवसायात त्या पैशांची गुंतवणूक केली.