मुख्यमंत्री, गृहमंत्री यांच्यासह पोलिस महासंचालकांकडे सादर
मंगेश फरपट
व-हाड दूत न्युज नेटवर्क
अकोला: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या विरोधात माझ्याकडे भ्रष्टाचाराचे पुरावे असून त्यांची चौकशी करण्यात येवून गुन्हा दाखल करण्यात यावा अशी तक्रार अकोला पोलिस नियंत्रण कक्षाच्या एका पोलिस निरिक्षकाने मुख्यमंत्री, गृहमंत्री यांच्यासह पोलिस महासंचालकांकडे दाखल केली आहे. जेव्हा चौकशी सुरु होईल तेव्हा हे पुरावे मी सादर करेन असेही तक्रारकर्त्या निरिक्षकाने म्हटले आहे.
अकोला पोलीस नियंत्रण कक्षाचे पोलिस निरिक्षक भिमराज उर्फ भिमराव रोहिदास घाडगे यांनी २० एप्रिलरोजी पत्राद्वारे परमबीर सिंग यांच्यावर आरोप केले. सिंग यांच्या विरोधातली भ्रष्टाचाराची ही दुसरी तक्रार आहे. गेल्या महिन्यात त्यांची मुंबई पोलीस आयुक्त या पदावरुन बदली करण्यात आली होती. पहिली तक्रार मुंबईचे पोलीस अधिकारी अनुप डांगे यांनी दाखल केली होती. पोलीस महासंचालकांना दिलेल्या या 14 पानांच्या तक्रारीमध्ये घाडगे यांनी म्हटलं आहे की, परमबीर सिंग हे ठाणे शहर येथे पोलिस १७ मार्च २०१५ ते ३१ जुलै २०१८ दरम्यान कार्यरत होते. तेव्हा त्यांनी आपल्या पदाचा व अधिकाराचा गैरवापर करून स्वत:चे आर्थीक फायद्यासाठी मनमानी कारभार केला. ते भ्रष्टाचाराच्या अनेक प्रकारांमध्ये सामील होते. जमीन घोटाळे, सरकारी निवासस्थानाचा तसंच सुविधांचा गैरवापर आणि इतर प्रकारच्या भ्रष्टाचारांमध्ये ते सामील असल्याचा आरोप सिंग यांच्यावर केला आहे. सिंग हे ठाण्याचे पोलीस आयुक्त असताना घाडगे बाजार पेठ पोलीस स्टेशनमध्ये कर्तव्यावर असल्याचंही घाडगे यांनी म्हटलं आहे. “माझ्याकडे या भ्रष्टाचाराचे सर्व पुरावे आहेत आणि जेव्हा चौकशी सुरु होईल तेव्हा हे पुरावे मी सादर करेन असे घाटगे यांनी म्हटले असून यापूर्वी सुद्धा परमबीर सिंग यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. मात्र त्यांच्याविरुद्ध कोणत्याही प्रकारची कायदेशीर कार्यवाही करण्यात आली नाही. आता तरी प्रकरणाची चौकशी करून परमबीर सिंग यांच्यासह संबधित अधिका-यांविरुद्ध गुन्हा दाखल करून कारवाई करावी असे घाडगे यांनी तक्रारीत म्हटले आहे.