अकोला : कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी शासनाकडे केवळ लॉकडाऊनचा पर्याय आहे. आतापर्यंत परिणामकारक उपाययोजनासाठी सरकारकडे रणनिती नाही. मग कोरोना संकटाचा सामना करणार कसा असा प्रश्न वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.
याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा प्रतिभा भोजने, डॉ.धैर्यवर्धन पुंडकर, ज्ञानेश्वर सुलताने, प्रदीप वानखडे, सावित्रीबाई राठोड़, डॉ. प्रसन्नजीत गवई व पराग गवई उपस्थित होते. ते म्हणाले की, जिल्हाधिका-यांची भेट घेऊन जिल्हा परिषद भवनात जिल्हा परिषदेतर्फे 50 बेडची सुविधा देण्याचा प्रस्ताव देण्यात येईल. यासाठी जिल्ह्यातील दानशूर व्यक्तींनी जिल्हा परिषद सीईआेकडे मदत करण्याचे आवाहन केले आहे. महापालिका क्षेत्रातील सर्व कोविड सेंटर पुन्हा सुरु करण्यात यावे, होम क्वारंटाईन रुग्णांमुळेच कोरोनाचे संक्रमण वाढत असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला. प्रशासनाने कोविड सेंटर सुरू करून रुग्णांना योग्य सेवा देण्याची गरज आहे. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सुरु करावे, नोडल अधिका-यांची नियुक्ती करावी, नोडल अधिका-यांनी प्रमाणित केल्यानंतरच रुग्णांनी रुग्णालयाचे बिल भरावे. ते म्हणाले की, लसीकरणाची मार्केटींग सुरु आहे. संपूर्ण देशात लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे.