व-हाड दूत न्युज नेटवर्क
अकोट जि. अकोला: उपचारासाठी रुग्णाला घेवुन येत असताना 108 क्रमाकांच्या रुग्णवाहिकेचे टायर पंचर झाल्यानंतर पर्यायी टायर उपलब्ध नव्हते आणि दुसरी रुग्णवाहिका यायला २.३० तास वेळ लागल्यामुळे युवकाचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार संबधित रुग्णवाहिकेच्या चालकासह जिल्हा व्यवस्थापकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
अकोट तालुक्यातील वणीवारुळा येथील रोशन निरंजन पळसपगार (१९ वर्ष) हा युवक आजारी असल्याने अकोट ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आला होता.तब्येत गंभीर असल्याने ग्रामीण रुग्णालयाने एमएच १४ सीएल ०८१३ क्रमांकाच्या १०८ रुग्णवाहिकेतून त्याला अकोला येथे पाठविले. पळसोद फाटानजीक रुग्णवाहिकेचे मागील टायर पंचर झाले. रुग्णवाहिकेमध्ये पर्यायी टायर उपलब्ध नव्हते. दुसरी रुग्णवाहिका यायला तब्बल २.३० तास वेळ लागला. उपचारास विलंब झाल्याने, रुग्ण रुग्णवाहिकेतच दगावला. या घटनेची माहिती प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष निखिल गावंडे यांनी पालकमंत्री बच्चू कडू यांच्या निदर्शनात आणून दिली होती. दरम्यान पालकमंत्री कडू यांनी तत्काळ दोषींवर फौजदारी कारवाईचे आदेश दिले होते. अकोट येथील वैद्यकीय अधीक्षक मंगेश लक्ष्मण दातीर यांच्या तक्रारीनुसार आरोपी चालक ऋषिकेश निमकर, जिल्हा व्यवस्थापक व भारत विकास ग्रुप यांच्याविरुद्ध भादंवि कलम ३०४ नुसार गुन्हा दाखल केला.पुढील तपास दहिहांडा ठाणेदार प्रकाश अहिरे करीत आहेत.