मंगेश फरपट
व-हाड दूत न्यूज नेटवर्क
अकोला: मेळघाट वन क्षेत्रातील वन परिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांची आत्महत्या वाघ आणि साग तस्कारांमुळे तर झाली नाही, याचा शोध घेण्याची गरज आहे. तसेच वाघांचे (शिवसेनेचे) सरकार असताना वाघांची तस्करी रोखण्यात अपयश का येते, या प्रश्नाला उत्तर देताना, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, राज्य सरकार वाघांचे की लांडग्यांचे हा कळीचा मुद्दा बनल्याचे सांगितले.
बुधवारी दुपारी शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत आंबेडकर म्हणाले, महिन्याला 100 कोटी वसुली प्रकरणात चौकशी आयोग स्थापन करुन सीएम ऑफिस यात सहभागी असल्याच्या संशयाला जागा निर्माण करुन दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात स्वतःला दूर करण्यासाठी फोन टॅपिंगचा अहवाल सार्वजनिक करावा, अशी मागणी आंबेडकर यांनी केली. वाढत्या कोरोनाला राज्य शासन जबाबदार असल्याचा आरोप करुन ते म्हणाले, यापुढे लागू होणारे लॉकडाऊन वंचित आघाडी मोडून काढेल. तसेच, पंढरपूर मतदार संघात वंचित बहुजन आघाडीतर्फे विरप्पा मधुकर मोटे यांची उमेदवारी त्यांनी जाहीर केली.
मेळघाटातील वाघांची घटती संख्या व साग तस्करी यांचा दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येशी काही संबंध आहे का, याचा खुलासा राज्य शासनाने करावा. अन्यथा वंचित बहुजन आघाडी आठवडाभरात खुलासा करेल. अमरावती येथील वंचितच्या नेत्या प्रा.निशा शेंडे पुढील आठवड्यात यावर प्रकाश टाकतील असे अॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले. मेळघाट मधील अशासकीय स्वयंसेवी संस्थांनी किती आदिवासींची जमीन लाटली, याची चौकशी झाली पाहिजे. तसेच दीपाली चव्हाण यांनी केलेल्या तक्रारींची चौकशी झाली पाहिजे. चव्हाण यांच्यावर दाखल अॅट्रासिटी प्रकरणात नेमके कोण होते, त्यांची सांपत्तीक स्थिती, याची माहिती राज्य शासनाने सार्वजनिक करावी. असेही आंबेडकर म्हणाले.
फोन टॅपिंग प्रकरणात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी स्वतः निर्णय घेत सर्व अहवाल सार्वजनिक करावा,अशी मागणी अॅड. आंबेडकर यांनी केली. पोलिस अधिका-यांच्या बदली संदर्भात खिरापत वाटपात कोण सहभागी होते व किती कोटींची खिरापत वाटली याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी करावा. मुख्यमंत्र्यांना या विषयी सर्व माहिती असून त्यांनी ती माहिती सार्वजनिक करावी अशी मागणीही अॅड.आंबेडकर यांनी केली. या वेळी वंचितचे नेते डॉ.धैर्यवर्धन फुंडकर, प्रदीप वानखडे, प्रसिध्दी प्रमुख डॉ.प्रसन्नजीत गवई, ज्ञानेश्वर सुलताना, पांडे गुरुजी, राम गव्हाणकर उपस्थित होते.