– सर्वसाधारण महिला प्रवर्गाची आरक्षण सोडत जाहीर
– विद्यमान सभापती चंद्रशेखर पांडे गुरुजी यांना फटका
– इच्छुक उमेदवारांनी घेतला आक्षेप
व-हाड दूत न्युज नेटवर्क
अकोला: सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्ह्यात नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गच्या (ओबीसी) रिक्त झालेल्या जिल्हा परिषदेच्या १४ जागा आणि त्या अंतर्गत जिल्ह्यातील सात पंचायत समितीच्या २८ जागा सर्वसाधारण प्रवर्गातून भरण्यात येणार आहेत. त्यासाठी सर्वसाधारण महिला प्रवर्गाच्या आरक्षणाची सोडत मंगळवारी काढण्यात आली. त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या रिक्त जागांचे आरक्षण सोडत जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आणि पंचायत समित्यांच्या रिक्त जागांची सोडत जिल्ह्यातील सातही तहसील कार्यालयात काढण्यात आली आहे. यामध्ये जि.प.चे विद्यमान शिक्षण व बांधकाम समिती सभापती चंद्रशेखर पांडे गुरुजी यांना या आरक्षणाचा फटका बसला असून त्यांच्या कानशिवणी जिल्हा परिषद सर्कल मध्ये सर्वसाधारण महिला हा प्रवर्ग निघाल्याने त्यांची चांगलीच गोची झाली आहे.
गतवर्षी जानेवारी महिन्यात घेण्यात आलेल्या ल्हा परिषद व त्या अंतर्गत जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीत देण्यात आलेल्या प्रवर्ग निहाय आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा जास्त झाल्याने, या निवडणुकीत निवडून आलेल्या नागरीकांचा मागास वर्ग प्रवर्गातील सदस्यांचे सदस्यत्व रद्द करून पुन्हा निवडणूक घेण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने चार मार्च रोजी दिला होता त्यानुसार जिल्ह्यातील ओबीसी प्रवर्गातील निवडून आलेल्या जिल्हा परिषदेच्या १४ सदस्यांचे आणि सात पंचायत समित्यांच्या २८ सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले होते राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार रिक्त झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या जागा सर्व साधन प्रवर्गातून भरण्यात येणार आहेत त्यासाठी सर्वसाधारण महिला प्रवर्गाच्या आरक्षणाची सोडत मंगळवारी काढण्यात आली आहे.