व-हाड दूत न्युज नेटवर्क
अकोला: कोविड संसर्गामुळे व्यापाऱ्यांना चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, त्याप्रमाणात जिल्ह्यात कोविड चाचणी केंद्राची सुविधा देण्यात आली नाही. परिणामी आहे त्या चाचणी केंद्रांवर व्यापारी, नागरिकांची गर्दी होत आहे. त्यातून संसर्ग अधिकच वाढण्याची शक्यता असल्याने कोविड चाचणी केंद्र वाढवण्याची मागणी भाजपचे प्रवक्ते नगरसेवक गिरीष जोशी यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.
राज्य शासनाकडून कोविड-१९च्या नावाखाली दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. सर्वसामान्य नागरिकांसोबत शेतकरी व व्यापारीमध्ये त्यामुळे असंतोष निर्माण होत असल्याचा आरोप जोशी यांनी केला आहे. कोविडचा प्रादुर्भाव संपूर्ण राज्यात वाढत असल्याने यासंदर्भात उपाय योजना तसेच आरोग्य विभागाच्या सूचनेचे पालन करणे गरजेचे आहे. त्यासाठी चाचण्या वाढविणे गरजेचे आहे.या चाचणी करून घेण्यासाठी आवश्यक केंद्रांची संख्या वाढविण्याची गरज आहे. तसे न करता जिल्हा प्रशासनाने सोमवारपासून सर्व दुकानदारांची कोविड चाचणी झाली किंवा नाही याची तपासणी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यांच्यावर कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र नसले त्यांची दुकाने सिल केली जाणार आहे. हा कारवाई करून प्रशासनाकडून दहशत निर्माण करम्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप जोशी यांनी केला. केवळ चाचणीवर भर न देता नागरिकांनी माक्स वापरणे व सामाजिक अंतर राखणे आंदी बाबींचे पालन करावे, याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचेही जोशी यांनी सुचविले आहे.