सातत्याने मिळते हमखास यश!

0
421

 

जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात यश, अपयश यांचा पाठशिवणीचा खेळ सतत सुरू असतो. एखाद्याला सतत अपयश मिळत जाते असे कधी होत नाही. फरक एवढाच असतो; अपयश मिळणारी व्यक्ती त्याचा अर्थ कसा काढतो . एका पेक्षा जास्त वेळ अपयशी झालेली व्यक्ती त्याची कारणमिमांसा न करता नकारात्मक विचार करते आणि मग अपयशातली तिच्या वाट्याला आलेली यशाची किरणे ती पाहू शकत नाही परिणामी तिची पराभूत मानसिकता तयार होते.
तुम्हाला जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर सतत प्रयत्न करीत राहावे लागते. प्रत्येक प्रयत्नाच्या पूर्वी त्याला सामोरे जाताना स्वताला नित्य नुतन स्वरूपात तयार करावे लागते. आधी केलेल्या प्रयत्नाच्या तुलनेत अधिक कणभर तरी चांगला, सरस प्रयत्न मी करेल यासाठी स्वत:ला तयार करावे लागणे, त्यासाठी आवश्यक ती शारीरिक तयारी, मानसिकता तयार करणे यालाच सातत्य म्हणतात.
तुम्ही विद्यार्थी असाल तर अभ्यासाच्या तयारीचे जसे सगळे टप्पे तपासून त्या एकेकावर काम करीत जाणे याला पर्याय असू शकत नाही तसाच सातत्य किंवा हालचाल, काहीतरी करीत राहाणे याला कोणताही पर्याय असू शकत नाही. एखाद्या विषयात मिळालेले अपयश हे काही तुमच्याकडे कायम मुक्कामी येवू शकत नाही. आपण नेमके कुठे कमी पडलो याची जाणीव करून देण्याचा कदाचित तो तुमच्या जीवनातला छोटासा टप्पा असतो. इतर विषयांत प्रचंड गुण मिळाल्यावर इतिहासात का आपण काठावर पास झालो? या प्रश्नांने तुमचे डोके कुरतडायला सुरुवात झाली असेल तर तुम्ही योग्य मार्गाने जात आहात. एखाद्या उणीवेची बोच सतत जाणवत राहते हे पुढे जाण्याचे आणि जीवंतपणाचेही लक्षण समजले जाते. नव्वद गुुणांची अपेक्षा असताना गाडी काठावर कशी काय अडकली याचे शल्य ज्याच्या ऊरात सतत टोचत असते, तो त्यावर मार्ग काढल्याशिवाय राहात नाही.
मार्ग नाही असे एकही क्षेत्र आजच्या जगात अस्तित्वात नाही हे कायम लक्षात ठेवा आणि सतत कामाला लावून घ्या. उत्तम नियोजन, कठोर परिश्रम याला जगात कोणताच पर्याय नसतो हे आपापल्या क्षेत्रात उंचीवर गेलेल्या लाखो लोकांनी आजवर जगाला दाखवून दिले आहे. नोकरी, व्यवसाय किंवा अगदी रस्त्यावरचा छोटासा व्यवसाय जरी असला तरी त्यातच, सततचा बदल आणि रोजचा वाढत जाणारा संपर्क, त्या दृष्टीने चालणारे तुमचे डोके एक दिवस प्रत्येकाला यशाच्या एका मोठया उंचीवर पोहोचविल्याशिवाय राहात नाही हे वाक्य कायम लक्षात ठेवून पाऊल टाकायला हवे.
खासगी व्यापार, व्यवसाय हा आजच्या काळात सर्वात असुरक्षित आणि बेभरवशाचा व्यवसाय समजला जातो मात्र त्याची तुलना आपण सतत सरकारी नोकरीशी करीत असतो म्हणून अधिक त्रास होतो. रोजंदारीवर मजूरी करणार्‍या एखाद्या व्यक्तीशी स्वताची तुलना करून बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की त्याच्या तुलनेत तुमचे काम, मोबदला, स्वातंत्र्य आणि समाधान कितीतरी मोठे आहे. समाधान मानणे हा वेगळा भाग आहे आणि सतत कुणाच्या तरी तुलनेत स्वत:ला ठेवत जाणे हा वेगळा भाग असतो. तुम्ही समाधान कशात मानता? हे खूप महत्त्वाचे असते. कामाच्या दर्जाबाबत कायम असमाधानी आणि मिळणार्‍या सुविधांबाबत कायम समाधानी राहायला हवे. दर्जाचे असमाधान तुमच्या कामांच्या पद्धतीला वेगळ्या उंचीवर तर सुविधांचे समाधान तुम्हाला एखाद्या खाईत लोटल्याशिवाय राहणार नाही एवढे या दोन समाधानात अंतर असते. एखादे काम हाती घेतल्यावर काही काळातच त्यात अपयश आले तर निराश न होता ते काम सोडू नका, सातत्य ठेवा, नवनवे प्रकार शिका, नव्या लोकांना भेटा, नव्या ग्राहकांपर्यंत जा, त्यांना तुमचा हेतू आणि त्यांचा फायदा समजावून सांगा, दहापैकी कदाचित आठ जण नैराश्यात भर घालतील. परंतु त्या अनुभवाने निराश होवू नका. सगळ्याच क्षेत्रात कसोटीच्या एवढ्या पायर्‍या पार कराव्या लागतात, जिद्द चिकाटी अन नाविण्याचा ध्यास कायम ठेवला तर एकदिवस तुम्ही ज्या क्षेत्रात काम करता त्या क्षेत्राला तुमचा अभिमान नक्कीच वाटायला लागतो, यश तुमच्या शोधात येते.

पुरुषोत्तम आवारे पाटील
अजिंक्य भारत ,अकोला
संवाद -9892162248
आमच्या ई पेपरला भेट द्या
www.ajinkyabharat.in

Previous articleगुटखा प्रकरणात जामिन मिळू नये- ना. डॉ. राजेंद्र शिंगणे
Next articleव्यापारी, शेतकरी, कामगार जगवायचा असेल तर…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here