बुलडाणा : पोलीस कुटुंबीयांसाठी घे भरारी हा प्रकल्प महत्त्वपूर्ण असून असे प्रकल्प अनेक जिल्ह्यात राबविले गेले पाहिजेत.उपक्रमातंर्गत प्रतिभेला वाव मिळून जिवनात यशाचा सुवर्णमध्य साधता येतो, असे प्रतिपादन जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप भुजबळपाटील यांनी शनिवारी केले.
घे भरारी हा अनोखा व महत्त्वपूर्ण प्रकल्प बुलडाणा पोलीस कल्याण विभागांतर्गत पोलिस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमांतर्गत निबंध लेखन, चित्रकला स्पर्धा, पोलिस वसाहत व आपला परिसर स्वच्छता अशा विविध स्पर्धां बक्षीस वितरण समारंभ शनिवारला जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ दिलीप भुजबळ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.
निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा चार गटांमध्ये घेण्यात आली होती. या स्पर्धेत प्रथम ,द्वितीय व तृतीय आलेल्या विजेत्यांना सौ.निलीमा भुजबळ पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र व रोख राशी देऊन गौरविण्यात आले.
बुलडाणा जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, पोलीस कुटुंबीयांसाठी घे भरारी हा प्रकल्प महत्त्वपूर्ण असून असे प्रकल्प अनेक जिल्ह्यात राबविले गेले पाहिजेत. लवकरच निबंध स्पर्धाचे पुस्तक पोलिस विभागामाफॅत प्रकाशित करण्यात येणार आहे. तसेच चित्रकलेच्या चांगल्या चित्रांचे क्यालेंडर प्रकाशित करण्यात येणार आहे. बुलडाणा जिल्ह्यातील पोलीस कुटुंबीयांमध्ये एक कौटुंबिक भावना व आलेल्या संकटांना समोर जाण्याची प्रेरणा घे भरारी या उपक्रमातून पोलीस कर्मचारी व त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांना मिळाली आहे .उद्याचे प्रतिभावंत लेखक, चित्रकार घडविणारा हा उपक्रम महत्त्वाचा असल्याचे त्यांनी या प्रसंगी सांगितले.
याप्रसंगी स्पर्धेच्या परीक्षकांचा सुद्धा सन्मान या प्रसंगी करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन नरेंद्र लांजेवार यांनी तर आभार प्रदर्शन ना.है.पठाण यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी बुलडाणा जिल्हा पोलीस कल्याण शाखेचे होम डिवायएसपी बळीराम गीते यांनी विशेष मेहनत घेतली.