शनि अमावस्या.. श्री शनिशिंगणापूर 

0
617
व-हाड दूत न्युज नेटवर्क
अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डीजवळ वसलेल्या एक प्रमुख आणि जागृत क्षेत्र म्हणून शनि शिंगणापूर हे संपूर्ण महाराष्ट्नला परिचित आहे. शनी मंदिरामुळे गावाच्या नावात शनी जोडले गेले. अहमदनगरपासून 30 किलोमीटर अंतरावर नेवासे तालुक्यात सोनई गावापासून जवळच शनिचे शिंगणापूर हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. येथे शनिदेव स्वयंभू पाषाण रूपात विराजमान आहेत.
येथे श्रीशनैश्वराचे स्वयंभू जाज्वल्य देवस्थान असून शनैश्वराची मूर्ती ५ फूट ९ इंच उंचीची आहे. या मंदिरात असलेला दगडी स्तंभास शनिदेवाची मूर्ती मानली जाते. सुमारे दीडशे वर्षांपूर्वी एका पुरात ही शिळा वाहत सोनई गावाजवळ आली. या स्तंभाला तसा वेगळा आकार नाही. त्या रात्री शनिदेवाने एका गावकर्याला दृष्टांत देऊन ‘मामा-भाच्यांनी मिळून माझी स्थापना करा’, असा दृष्टांत दिला आणि गावकर्यांनी ती शिळा उभी करून तिची पूजा करण्यास प्रारंभ केला. विशेष म्हणजे हा देव उघड्यावरच एका चौथऱ्यावर आहे. देव आहे पण देऊळ नाही असे या देवाचे वैशिष्ट्य होय. एका व्यापार्याने नवस बोलल्यानंतर त्याला शनिदेव प्रसन्न झाल्याने त्याने शिळेभोवती चौथरा बांधला आहे. मूर्तीच्या डोईवर वृक्ष पण नाही. नजिकच्या लिंबाच्या वृक्षाची फांदी डोईवर आली तर ती गळून पडते. शनिदेवास निवारा आवडत नसल्याने या पाषाण शिळेवर कोणताही निवारा नाही. वर्षप्रतिपदा आणि वर्षातील प्रत्येक महिन्याचे चारही शनिवार येथे यात्रा भरते. शनी देवाला खूश करण्यासाठी येथे तेल वाहिले जाते. रोज हजारो लीटर तेल शनिदेवाला अर्पण केले जाते. शनि अमावास्या व गुढीपाडवा या दिवशी येथे मोठी यात्रा असते. शनि जयंतीस (वैशाळी अमावस्या) येथे उत्सव साजरा होतो.
#आख्यायिका
या स्वयंभू मूर्तीबद्दल अनेक आख्यायिका भाविकात प्रचिलित आहेत. येथील कथाही रोचक आहे. शनी देव येथेच वास्तव्य करतात, असे मानले जाते. त्यामुळे येथे चोरी होत नाही, असे सांगितले जाते. त्यामुळे गावातील घरांनाही कुलपे नाहीत. एवढ्या वर्षांत घरातून कधी एक खिळाही चोरीला गेलेला नाही, असे येथील लोक गौरवाने सांगतात. या लहानशा गावाची लोकवस्ती सुमारे ३००० असेल पण येथील घरांना दरवाजे नाहीत याचे आश्चर्य वाटते. शनीच्या या नगरीची रक्षण खुद्द शनी देव करतात असे लोक मानतात. चोरी केल्यावर,कोणीही चोर या गावाची सीमारेषा जिवंत अवस्थेत पार करूच शकत नाही असेही सांगितले जाते. तेथे चोरी केल्यास अंधत्व येत असल्याची आख्यायिका भाविकांमध्ये प्रचलित आहे. शिंगणापूर गावाच्या हद्दीच्या आत साप चावल्यास संबंधित व्यक्तीला शनिदेवाच्या मूर्तीजवळ घेऊन गेल्यास विष उतरते, असे येथे सांगतात. अगदी जगावेगळे असलेले हे देवस्थान चमत्कारांमुळे खूप प्रसिद्ध पावले आहे.
येथील मंदिरात दर्शनाचे नियम अतिशय कडक आहेत. देव दर्शन दिवसातून कोणत्याही वेळेस घेता येते. शनी बाल ब्रह्मचारी असल्याने महिला दूरूनच दर्शन करतात. स्त्रियांना मात्र चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेण्यास मनाई आहे. दुरून दर्शन घेता येते. दर्शनापूर्वी आंघोळ करून शुचिर्भूत होणे आवश्यक असते. आंघोळीची व्यवस्था देवस्थानाच्या आवारात कायम आहे. पुरूष स्नान करून, ओल्या कपड्यांनीच दर्शन घेतात. त्यानंतर शनीच्या मूर्तीवर तीळाचे तेल वाहून प्रदक्षिणा घालतात. दर्शन घेतल्यानंतर भाविक तिथे असलेल्या दुकानातून घोड्याची नाल तसेच काळ्या कपड्यांनी बनलेली शनी देवाची बाहुली खरेदी करतात. घोड्याची नाल घराच्या बाहेर लावल्याने दृष्ट लागत नाही, असे मानले जाते. शिवाय घरात सुख-समृद्धी नांदते.

– संतोष रायणे
व्यावसायिक, शेगाव 

Previous articleखांबोरा आणि घुसर पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा खंडित; महावितरणची कारवाई
Next articleकिसानपुत्रांचे अन्नत्याग आंदोलन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here