वर्हाड दूत न्यूज नेटवर्क
बुुुलडाणाा: गेल्या वर्षापासून राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या तारखा निश्चित होत नसून याच बाबींमुळे तणावात असलेल्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणा-या एका 30 वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाल्याची घटना 15 मार्च रोजी घडली आहे.
साखरखेर्डा येथील 30 वर्षीय तरुण गणेश केशव बेंडमाळी हा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेची तयारी करीत होता. एक वर्षापासून या स्पर्धेची परिक्षा न झाल्याने तो तणावाखाली वावरत असल्याचे मत त्याच्या भावाने व्यक्त केले आहे. कोरोनाकाळात अनेकांची करिअरची स्वप्ने भंगल्याने अशा विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या घटना अलीकडे वाढत चालल्या आहेत. गणेश हा स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अधिकारी बनण्याची सुंदर स्वप्ने रंगवित होता. गणेश अल्पभूधारक असून त्याच्या घरची आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची आहे. त्याच्या वडिलांचा दोन वर्षांपूर्वीच कँसर ने मृत्यू झाला होता. त्यामुळे अधिकारी होऊन कुटुंबाचा आधार होण्याचा विचार गणेश करत होता. मात्र परीक्षा होत नसल्याने तो तणावाखाली वावरत होता आणि 14 मार्च रोजी रात्री 11 वाजता अचानक छातीत दुखू लागल्याने त्याला तातडीने चिखली येथे उपचार्थ हलविण्यात आले. मात्र मध्येच त्याची प्राणज्योत मालवली.