मंडप, कॅटर्स व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ तुपकरांच्या उपस्थितीत जिल्हा कचेरीवर धडक

0
260

वर्‍हाड दूत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने अशंत: लॉकडाऊन लागू केले आहे. यामध्ये लग्न किंवा इतर समारंभासाठी अतिशय कमी जणांची परवानगी देण्यात आली आहे. याचा थेट परिणाम मंडप डेकोरेशन, लॉन, मंगल कार्यालय, कॅटर्स व या व्यवसायाशी निगडीत असलेल्यांवर होत आहे. या सर्वांचा विचार करता समारंभासाठी प्रशासनाने यापूर्वी ठरवून दिलेल्या संख्येपेक्षा अधिक लोकांची परवानगी वाढवून द्यावी, अशी मागणी रविकांत तुपकर यांनी जिल्हाधिका-यांकडे केली आहे.
गेले संपूर्ण वर्ष कोरोनामुळे लॉकडाऊनमध्येच गेले त्यामुळे मंडप डेकोरेशन, बिछायत केंद्र, लॉन, मंगल कार्यालये, कॅटर्स यांचा संपूर्ण व्यवसाय बुडाला. यावर्षी कसेबसे व्यवसाय सुरु होत असताना पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढला आणि प्रशासनाने निर्बंध लादले. त्यामुळे हतबल झालेल्या या व्यावसायीकांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांची भेट घेऊन त्यांच्याकडे आपली कैफीयत मांडली. सुमारे दोनशेहून अधिक जणांच्या शिष्टमंडळाने रविकांत तुपकर यांना आपली समस्या सोडविण्याची मागणी केली असता या शिष्टमंडळाला घेऊन त्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. यावेळी जिल्हाधिका-यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यासह त्यांच्याशी या समस्येबाबत चर्चा केली. विवाह सोहळे व इतर कार्यक्रमांसाठी प्रशासनाने ठराविक संख्या ठरवून दिली आहे. त्यामुळे हे समारंभ जवळपास रद्दच होत आहेत. याचा परिणाम मंडप डेकोरेशन, बिछायत केंद्र, लॉन, मंगल कार्यालये, कॅटर्स यांच्या व्यवसायावर होत असून मोठा आर्थिक फटका त्यांना बसला आहे. शिवाय या व्यवसायाशी निगडीत असलेले इतर व्यवसाय आणि मजूर यांचीही उपासमार होत आहे.
जिल्हाधिका-यांचे आश्वासन
आधीच कर्ज काढून व्यवसाय सुरु केलेल्या व्यावसायीकांचे कर्ज आता डोईजड झाले आहे. हे व्यावसायीनक कोरोना संदर्भातील सर्व नियम काटेकोरपणे पाळण्यास तयार आहे. या सर्वांचे कुटुंब केवळ याच व्यवसायावर अवलंबून असल्याने प्रशासनाने लग्न सोहळा व इतर कार्यक्रमांसाठी ठरवून दिलेली नागरिकांची संख्या वाढवून द्यावी, अशी मागणी यावेळी रविकांत तुपकर यांनी केली. याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन व्यावसायीकांना दिलासा देऊ, अशी ग्वाही यावेळी जिल्हाधिकारी एस. राममूर्ती यांनी रविकांत तुपकरांना दिली.

Previous articleराज्यात जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीची विशेष मोहीम
Next articleशेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापू देणार नाही. शेतकरी नेते ललित बाहाळे यांनी धरले उपअभियंता यांना धाऱ्यावर !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here