अज्ञानी नियोजनाचे ठरणार व्यापारी, कामगार, अर्थव्यवस्था बळी..
झाले एक वर्ष झाले… कोरोना आता ब-यापैकी ओळखीचा झाला. पॉझिटिव्ह आल्यास काय काळजी घ्यावी,कुठले औषध घ्यावे याचा बऱ्यापैकी अभ्यास आता झाला आहे आणि त्याचेच परिणाम म्हणून मृत्यू दर कमी झाला आहे.
आज महाराष्ट्रात जे पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे याला खरच फक्त केवळ जनताच जबाबदार आहे का ?? नाही हल्लीचे जे जनतेचे भाग्य विधाते बसले आहेत ,त्यांना तरी किमान असेच वाटते. काय तर म्हणे लग्न समारंभातील गर्दीमुळे कोरोना वाढला..
अहो मायबाप तुम्ही दिवाळी नंतर सगळे मोकळे का सोडले?? शाळा कुठल्या आत्मविश्वासावर सुरू केल्या?? या मागचे लॉजिक काय??.. ग्रामपंचायत निवडणूक, मेळावे या रुग्ण वाढीला जबाबदार नाही का??
खरं तर आजच्या परिस्थितीला फक्त आणि फक्त तुम्हीच जबाबदार आहात..
पण याची शिक्षा समाजाने का भोगावी?? भाग्यविधाते साहेब थोडं गावोगावी फिरा अन बघा.. रिक्षावाला, न्हावी, भाजीवाला, फेरीवाला इत्यादी अनेक छोट्या लोकांच्या घरात चूल आनंदाने पेटते का?? मुलांना पोटभर खायला तरी मिळते का??
तुम्हाला हा अनुभव नसेलच …कारण तुमच्या मुलांनी काही मागणी केली की लगेच तुमचे शासकीय कार्यालयीन नौकर, गाडी दिमतीला हजर…
जरा हॉटेलात जाऊन मालकाला विचारा की बाबा मी तर तुला लगेच टाळा लावतो अन वरून फर्मान सुद्धा सोडतो की कर्मचाऱ्यांना पगार द्या…मग तू हे सगळं चालवतोस कसा?. आम्ही तर वीजबिल सुद्धा तुला सोडले नाही.. मग रे बाबा जगतोस कसा.. कळेल तुम्हाला कुणी कुणी घरातील काय काय विकले आहे तें… तुमचे कर , बिले भरून मुलांची स्वप्ने विकली आहेत प्रत्येकाने…
हे सर्व तुमचे पुण्य तुम्हाला तुमची मुले म्हातारं पणात व्याजासहित परत देवोत हीच ईश्वर चरणी प्रार्थना.. असो.
50% क्षमतेने हॉटेल किंवा कुठलेही काम 5 वाजे पर्यंत चालु शकते मग रात्री 10 पर्यंत काय हरकत आहे..
लग्नाला केवळ 50 लोकांची परवानगी.. तुम्हाला काय वाटले लोकं सोशल डिस्टनसिंग पाळून पार पाडतात…..ते कार्य कमी जागेत उरकतात म्हणजे गर्दी कायम.. त्यापेक्षा कार्यालयांना त्यांच्या एकूण क्षमतेच्या 30% पर्यंत परवानगी द्या व चेक ठेवा…बघा गर्दी होते का ते..
रुग्ण वाढले की तुम्ही तपासण्या वाढवता…तुमचा आपला एकच खटाटोप एकूण तपासणी पैकी पॉझिटिव्ह कमी दिसले पाहिजे ..म्हणजे तुमचे नियोजन चांगले..
बंद करा कागदी घोडे नाचवण्याचा खेळ.. त्या ऐवजी रुग्णालयात किती चांगली सुविधा मिळते , वर्ष झाले कोरोना योद्धे अहोरात्र जीव धोक्यात घालून काम करतायेत त्यांची स्तुती, सन्मान करा….खरे आशीर्वाद मिळतील.
– संतोष रायणे
हॉटेल व्यावसायिक, शेगाव