बुलडाणा जिल्हयातील खामगाव तालुक्यातील माक्ताकोक्ता येथे बोर्डी नदीकाठी बकऱ्या चारण्यासाठी गेलेल्या बापलेकासह एक जण वाहून गेल्याची घटना आज सकाळी घडली. गजानन लहानू रणसिंगे वय ३८, राहुल गजानन रणसिंगे वय १६, दिलीप नामदेव कळसकार वय ४२ अशी तिघांची नावे आहेत. बकरी चारत असताना एक बकरी पाण्यात पडली. तीला पकडण्याच्या प्रयत्नात राहूल गजानन रणसिंगे याने पाण्यात उडी मारली. प्रवाहाचा वेग जास्त असल्याने तो वाहून गेला. तर मुलाला वाचविण्यासाठी त्याचे वडील गजानन रणसिंगे व दिलीप कळसकार या दोघांनी सुद्धा पाण्यात उडी मारली. हे दोघेही पाण्यात वाहून गेले. गावकऱ्यांना दिलीप नामदेव कळसकार याचा शोध घेण्यात यश आले असून उर्वरीत दोघांचा शोध संध्याकाळपर्यंत सुरूच होता.