महाराष्ट्र पोलिसांचा फॅन्सी नंबर प्लेट वाल्यांना इशारा
व-हाड दूत न्युज नेटवर्क
मुंबई: महाराष्ट्र पोलिसांनी एक खास ट्विट करत हौशी वाहनचालकांना हे चालणार नाही, असा इशारा दिला आहे. बाॅस, ताई, दादा, बाबा सर्वांनी लक्षात ठेवा, वाहनावर सजावटी ‘नंबर प्लेट’ लावल्यास आपल्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकतं असं ट्विट महाराष्ट्र पोलिसांनी खास स्टाईलमध्ये केले आहे. गेल्या काही दिवसांपासून गाड्यांवर फॅन्सी नंबर प्लेट लावण्याचा एक ट्रेंड सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी कारवाईचा इशारा दिला आहे.
वाहनंही जप्त होऊ शकतात!
दादा, मामा, काका, साई, राम, पवार अशा नावांचे नंबर जुळवलेली वाहनं वेगवेगळ्या ठिकाणी पाहायला मिळतात. जे अशा प्रकारच्या नंबर प्लेट वापरात त्या वाहनधारकासांठी महाराष्ट्र पोलिसांचं ट्विट ही धोक्याची घंटा आहे. वापरत असाल तर आताच सावधान व्हा, कारण ज्यांच्या वाहनांच्या नंबर प्लेट फॅन्सी आहेत, अशा वाहन चालक अन् दुचाकीस्वारांच्या विरोधात वाहतूक पोलिसांनी खास मोहीम उघडली आहे. बऱ्याच जणांवर कारवाईसुद्धा करण्यात आली आहे. ज्यांच्यावर आधी कारवाई झालेली आहे, तरीसुद्धा ज्यांनी नंबर प्लेट्स बदललेल्या नाहीत, अशा लोकांची वाहनंही जप्त करण्यात आलेली आहेत.