व-हाड दूत न्युज नेटवर्क
अकोला: मुर्तिजापूर येथून जवळच काटेपुर्णा ते बोरगावमंजू दरम्यान हावड्यावरून मुंबईला जाणा-या गितांजली एक्सप्रेसचा मागील डबा रुळावरून घसरल्याची घटना काही वेळापूर्वी घडली. या मार्गावरील रेल्वेची वाहतूक ठप्प झाली असली तरी सुदैवाने या घटनेत जिवित हानी झाली नाही.
हावड्यावरून निघालेल्या ट्रेन नंबर 02260 या गितांजली एक्सप्रेसचा एक डबा अकोला- मुर्तिजापूर दरम्यान असलेल्या काटेपुर्णा नजीक 11.45 वाजेदरम्यान घसरला. या अपघातात जोरात आवाज झाल्याने प्रवाशांमध्ये एकच तारांबळ उडाली. डबा जरी रुळावरून खाली घसरला तरी या घटनेत एकाही प्रवाशाला दुखापत झाली नसल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले. रेल्वे प्रशासनाकडून तातडीने डबा रुळावर चढवण्याचे काम सुरु आहे. दुपारी २ वाजेपर्यंत या मार्गावरील रेल्वे वाहतूक सुरु झाली नव्हती.