खदान पोलिस ठाण्याचे निरिक्षक डी.सी.खंडेराव यांचा अनोखा उपक्रम
व-हाड दूत न्युज नेटवर्क
अकोला : चूल आणि मूल एवढेच महिलांचे कार्यक्षेत्र आता राहिले नसून त्यांच्यासाठी दाही दिशा खुल्या आहेत. प्रगतीच्या वाटेवर महिलांनी आज विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. अशा कर्तृत्ववान महिलांच्या कार्याची दखल घेत विविध ठिकाणी महिलांना सन्मानित करण्यात आले.
जागतिक महिला दिनानिमित्त खदान पोलिस ठाण्यात एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला. आपल्या सोबत दिवसरात्र जे पोलिस शिपाई काम करतात त्यांच्यामध्ये अधिकारी बनण्याची महत्वाकांक्षा जागृत व्हावी अशी कल्पना ठाणेदार डी.सी.खंडेराव यांच्या मनात आली. त्यांनी तत्काळ ठाण्यातील शिपाई अनिता खडसे यांना एक दिवसाची महिला ठाणेदार बनण्याची संधी दिली. गुन्हेगारी नियंत्रीत करण्यातील बारकावे यावेळी पोलीस निरीक्षक देवराव खंडेराव यांनी खडसे यांना समजावून सांगितले. याप्रसंगी पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी ठाण्यातील महिला पोलिस अधिकारी, कर्मचा-यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. भविष्यात मोठा अधिकारी बनण्याची इच्छा अनिता खडसे यांनी व्यक्त केली.
महिला पोलिसांना एक दिवस सुटी
मागील एक वर्षापासून शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. मागील वर्षी 22 मार्चपासून लॉकडाऊन लावण्यात आले. रस्त्यावर संचारबंदी प्रभावीपणे राबविण्याची जबाबदारी असल्याने शहर वाहतूक शाखेचा एकूण एक कर्मचारी रस्त्यावर उभा राहिला. 6 महिने ते एक वर्षाच्या चिमुकल्यांना घरी ठेऊन रस्त्यावर कर्तव्य बजावणा-या महिला रहादारी पोलिसांचा आज पोलिस निरीक्षक गजानन शेळके यांनी सत्कार केला.
एवढेच नव्हे तर त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महिला दिनानिमित्त सर्व महिला रहदारी वाहतूक पोलिसांना एक दिवस सुटी दिली. कुटुंब, लहान मुले, पती यांच्यासह स्वतः ला कोरोनापासून वाचविण्याचे मोठे आव्हान या महिलांसमोर आहे. शहर वाहतूक शाखेच्या महिला अंमलदार नीता संके, दीपाली नारनवरे, पूजा दांडगे, वैशाली रणवीर, अश्विनी माने यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.