हिवरे बाजार, पाटोद्याच्या धर्तीवर टाकळीचा विकास करणार! सरपंच संगिता प्रधान यांचा मनोदय

0
468

आरोग्य, शिक्षण, स्वच्छतेला प्राधान्य

सोहम घाडगे |

वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : आगामी काळात आरोग्य, शिक्षण व स्वच्छतेला आपण प्राधान्य देणार असून हिवरे बाजार, पाटोदा, राळेगण सिद्धीच्या धर्तीवर टाकळीचा विकास करणार असल्याचा मनोदय मोताळा तालुक्यातील टाकळी घडेकरच्या सरपंच सौ. संगीता संजय प्रधान यांनी व्यक्त केला.
टाकळी घडेकर हे जवळपास १ हजार लोकसंख्येचे गाव. येथे ७ सदस्यीय ग्रामपंचायत आहे. गाव लहान असले तरी गावची एकी मात्र मोठी आहे. एखादी गोष्ट सर्वानुमते ठरली म्हणजे ठरली. मग कोणाचा बाप आला तरी गावकरी आपला फैसला बदलत नाहीत. यंदा येथील ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाली. अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव असलेल्या आरक्षणाद्वारे सौ. संगीता संजय प्रधान सरपंच झाल्या तर अनंता भास्कर घडेकर यांची उपसरपंचपदी निवड झाली. सदस्य म्हणून सौ. प्रयागबाई दिनकर घडेकर, महेंद्रप्रसाद शुक्ला, सौ. लताबाई सुरेश ब्राम्हंदे, सौ. ज्योती विकास इंगोले यांची बिनविरोध निवड झाली आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया बिनविरोध झाल्याने सरपंचपदाचा जल्लोष साजरा करण्यासाठी कुठलीच मिरवणूक काढली नाही. फटाके फोडले नाही. केवळ मिठाई वाटून विजयोत्सव साजरा करण्यात आला. गावाचा विकास हेच एकमेव ध्येय समोर ठेवून कारभार करणार असल्याचा मानस सरपंचांनी बोलून दाखविला. गावात दर्जेदार आरोग्य सुविधा नाहीत. त्यासाठी पिंपरी गवळी किंवा माकोडीला जावे लागते. रात्री- अपरात्री रुग्णांची गैरसोय होते. विशेषतः प्रसूतीसाठी महिला रुग्णांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे गावात आरोग्य सुविधा उपलब्ध असणे गरजेचे आहे. त्याकरिता आपले प्राधान्य राहणार असल्याचे मत सौ. प्रधान यांनी व्यक्त केले. गावात आधी सातवीपर्यंत असलेली जि. प. शाळा आता चवथीवर आली आहे. चांगले शिक्षण मिळत नसल्याने पालकांनी आपली मुले बाहेरगावी पाठवायला सुरुवात केली आहे. आजच्या काळात इंग्रजी माध्यमातुन शिक्षण घेण्याकडे सर्वांचा कल आहे. त्यासाठी गावात इंग्रजीतून शिक्षण मिळाले पाहिजेत. चांगले शिक्षक गावात कसे येतील यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे संगीताताई यांनी सांगितले.
स्वच्छतेच्या बाबतीत अजिबात हलगर्जी नको. आपल्या घराची आपण स्वच्छता ठेवतो तसेच आपले गाव स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे. आज गावातील ७० टक्के लोकांकडे शौचालय आहेत. भविष्यात हा आकडा १०० टक्के झाला पाहिजे. प्रत्येक घरात शौचालय व हागणदारीमुक्त गाव करण्याचा मानस त्यांनी यावेळी बोलून दाखविला. आपल्या कार्यकाळात गावाला स्वच्छतेचा पुरस्कार मिळवून देण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणार असल्याचेही नवनिर्वाचित सरपंचांनी सांगितले. पिण्याच्या पाण्यासाठी गावात आरो प्लांट बसविण्याची आवश्यकता आहे. जागोजागी पथदिवे हवेत. पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण मोहीम राबविण्यात येईल. प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी घेतलयास पर्यावरणाचा समतोल साधने अवघड नाही. ग्रामपंचायतीच्या इमारतीची दुरवस्था झाली असून सुसज्ज ग्रामपंचायत भवन झाले पाहिजे. त्यासाठी जि. प. च्या माध्यमातून भरीव निधी खेचून आणण्यासाठी आपला प्रयत्न राहील असेही त्यांनी सांगितले.
माजी सरपंच सौ. शोभाबाई नामदेवराव पाटील, सौ. कमल काशीनाथ प्रधान, सौ. आशा अविनाश प्रधान, सौ. कविता विजय प्रधान, सौ. रुपाली गजानन खर्चे, सौ. वैशाली भागवत ब्राम्हंदे, सौ. करुणा रवींद्र प्रधान, सौ. अश्विनी अमोल प्रधान, निर्मला जगन्नाथ घडेकर, लिलाबाई पंढरी घडेकर, गुंफाबाई तोताराम घडेकर, बेबीबाई अनिल प्रधान, ज्योती समाधान इंगोले, ताईबाई सुभाष घडेकर, पल्लवी सज्जन प्रधान यांच्यासह ग्रामस्थांनी नवनिर्वाचित सरपंचांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Previous articleअकोल्यात भर वस्तीतील चार दुकानांना आग
Next articleचेक बाऊन्स झाल्यास खावी लागेल जेलची हवा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here