Home मूल नियमांचे उल्लंघन केल्याने अनेक दुकाने सील; अकोल्यात 20 पथक कार्यान्वित
व-हाड दूत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्हा प्रशासनाने व्यापा-यांना प्रतिष्ठाने उघडण्यासाठी सकाळी 9 ते 5 यावेळेत सूट दिली. परंतु व्यापारी व दुकानातील कर्मचा-यांना आधी त्यासाठी कोरोना चाचणी करणे आवश्यक आहे. चाचणी न करताच दुकान उघडणा-या व्यापारी प्रतिष्ठानांना सील करणे व दंडात्मक कारवाई करण्यासाठी प्रशासनाने शहरात 20 पथकांचे गठन केले आहे.
शुक्रवारी, या पथकांनी शहराच्या विविध भागात कित्येक दुकाने सील करून मोठ्या प्रमाणात दंडात्मक कारवाई केली. शहरातील महात्मा गांधी रोड, टिळक मार्ग, कोठडी बाजार, किराणा बाजार, सराफा बाजार, न्यू क्लाँथ मार्केट, गोरक्षण रोडवरील अनेक दुकानांवर कारवाई करण्यात आली. शहरातील व्यापा-यांना यापूर्वी कोविड टेस्ट करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र त्यानंतरही कोरोना टेस्टींगचा रिपोर्ट नसताना दुकान उघडणा-यांची दुकाने सील करण्यात आली. तसेच सोशल डिस्टन्सींगच्या नियमांचे उल्लंघन तसेच मास्क न वापरणा-यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
चाचणी केल्यावरच दुकान उघडता येणार आहे. चाचणी न करता दुकान उघडल्याने दुकाने सील करण्यात येत आहेत. त्यामुळे कोरोना चाचणी करण्यासाठी केंद्रावर व्यापा-यांची गर्दी वाढतच आहे. कोविड चाचणी केंद्रावर गर्दी वाढल्याने व्यापा-यांचा क्रमांक लागत नाही. त्यामुळे त्यांच्यावर दुकान बंद ठेवण्याची वेळ आली आहे. चाचणी न झाल्यामुळे व्यापा-यांना महानगर पालिका शोध पथकांचा रोष ओढवून घ्यावा लागत आहे. तसेच मोठ्या प्रमाणात दंड भरावा लागत आहे किंवा दुकाने सील होत आहेत. तर दुसरीकडे भाजीपाला व फळ विक्रेते मास्क, सोशल डिस्टन्सींगची भीती न बाळगता सर्रास गल्ली बोळात फिरत आहेत. एक विक्रेता किंवा व्यापारी बाधित असल्यास त्याच्या संपर्कात येणा-यांनाही कोविडची भीती आहे. मनपा प्रशासनाने कोविड 19 टेस्ट करण्यासाठी केलेली उपाययोजना चांगली असली तरी तोकडी आहे. ही कारवाई मनपा आयुक्त पंकज जावळे यांच्या मार्गदर्शनात सुरु आहे.
प्रभागनिहाय कोविड सेंटर सुरु करा
यासाठी प्रभाग निहाय कोविड सेंटर सुरू करण्यात यावे, जेणेकरून वेगाने कोरोना चाचण्या होतील. भाजीपाला, फळ, मांस विक्रेते यांच्या चाचण्या लवकर होणे गरजेचे आहे. प्रशासनाने दखल घेऊन कोविड टेस्ट सेंटर वाढवावे अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या वतीने डॉ अशोक ओळंबे, हेमंत जकाते, मनोज अग्रवाल यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे मनपा प्रशासन व जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.
शनिवार, रविवारी लॉकडाऊन
दि.6 व 7 फेब्रुवारी रोजी शनिवार, रविवारी बाजार उघडे राहणार आहेत. परंतु पुढच्या आठवड्यात शनिवार आणि रविवारी जिल्हा प्रशासनाच्या आदेशाने संपूर्ण लाँकडाऊन राहणार आहे. अकोला शहर, मुर्तिजापुर शहर आणि अकोट शहरासह तिन्ही शहरात कंटेनमेंट झोन आहेत. हा आदेश तिन्ही शहरासह संपूर्ण जिल्ह्यात लागू राहणार आहे.
© All Rights Reserved