आता व-हाडी बोली भाषेत शब्द, म्हणी व वाक्प्रचार शब्दकोश उपलब्ध

0
903

व-हाड दूत न्युज नेटवर्क 
अकोला: श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे माजी प्राचार्य तथा तिफनकार डॉ. विठ्ठल वाघ व याच महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी डॉ. रावसाहेब काळे यांनी संपादित केलेला व-हाडी बोली शब्दकोश, म्हणीकोश व वाक्प्रचार कोश उपलब्ध झाला आहे. त्याचे प्रकाशन मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने राज्य मराठी विकास संस्थेतर्फे मुंबईत करण्यात आले.
महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाने डॉ. रामदास डांगे यांच्या अध्यक्षतेखाली बोली प्रकल्प 2011 मध्ये सुरु केला होता. महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यापीठाला बोली प्रकल्प दिला होता. काही विद्यापीठाने हे काम नाकारले तर काही विद्यापीठाने आपल्या मराठीविभागामार्फत हा प्रकल्प पूर्ण केला. याला अपवाद ठरले ते संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ. या विद्यापीठातील मराठी विभागाने अशा प्रकारचे काम यापूर्वीच डॉ.विठ्ठल वाघ व रावसाहेब काळे हे करत आहे असे ज्ञात असल्यामुळे हा प्रकल्प यांना पूर्ण करण्यासाठी दिला. डॉ. विठ्ठल वाघ हे मुख्य संशोधक, डॉ.रावसाहेब काळे हे साहाय्यक संशोधक, व ह्या संपूर्ण प्रकल्पाचे काम पाहण्यासाठी डॉ. मनोज तायडे हे प्रकल्प प्रमुख म्हणून कार्य केले. हे काम अमरावती, आकोला व लोणी असे तीन ठिकाणावरून चालू झाले. कोणी कोणाचा मालक नाही व कोणी कोणाचा नोकर नाही. कुठेही कोणाची हजेरी नाही ना सही नाही. सर्वांना असलेली आपली कामाच्या प्रती आपुलकी. ‘असे घ्यावी जीव कामात ओतून, जसा म्हशीच्या थानाले बसे गोचीड चिटकून’ या वाघ सरांच्या ओळीप्रमाणे कामाला सुरुवात झाली. वाघ सरांनी व-हाडातील गाव आणि गाव एकट्याने हिंडून व-हाडी बोलीतील एकएक शब्द गोळा केले, म्हणी गोळा केल्या, वाक्प्रचार गोळा केले. जसे येतील तसे. लहान मुलांच्या शाळेतून, म्हाता-या माणसांच्या जवळून शब्द, म्हणी, वाक्प्रचार गोळा केले. आपल्या कविता गावातील अबालवृद्धाना ऐकवत व त्यांच्या जवळून हे सर्व साहित्य जमा करत होते. असे अविरत काम चार वर्ष चालू राहीले आणि 2014 मध्ये हा प्रकल्प पूर्ण झाला.
     
वाघांची मेहनत फळाला..
रावसाहेबांचीही लाभली साथ

डॉ. विठ्ठल वाघ हे व-हाडातील असल्यामुळे आयुष्यभराच्या, चाळीसपन्नास वर्षांच्या त्यांच्या अवलोकनातून हा प्रकल्प उभा राहिला. त्यांनी काव्यगायनाला सुरुवात केली तेव्हापासूनच त्यांनी व-हाडी बोलीतील शब्द, म्हणी व वाक्प्रचार जमा करायला सुरुवात केली ते आजपर्यंत. ‘पारंपरिक व-हाडी म्हणीचा चिकित्सक अभ्यास’ हा त्यांच्या संशोधनाचा विषय असल्यामुळे संपूर्ण व-हाडात काव्ययात्रा काढली. या काव्ययात्रेत पायी गावागावात फिरून लोकांच्या समोर ‘तिफण हाकलली’ आणि व-हाडातील हजारो लोकांनी म्हणी, शब्द, वाक्प्रचारांच्या ओट्या भरूभरू या ‘तिफणक-याला’ लोकवाङ्मयाने श्रीमंत केले. तीच श्रीमंती आज या कोशाना लाभली आहे.
एवढे मोठे कोश तयार करणारी व-हाडी बोली ही महाराष्ट्रातील पहिली बोली आहे. आजपर्यंत अनेक बोलींचा भाषाशास्त्रीय अभ्यास झाला आहे. मात्र, अशा प्रकारचा महाविशाल प्रकल्प गाडगे बाबा, भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांचा वारसा सांगाणा-या त्यांच्या लेकरांनी पूर्ण केला. ही समस्त वर्‍हाडकरांच्या अभिमानाची गोष्ट आहे. चक्रधर स्वामींनी व-हाडी बोलीला जो राजभाषेचा दर्जा दिला होता तोच दर्जा आज व-हाडी बोलीला मिळत आहे.
मुख्यमंत्र्यांकडून प्रशंसा
प्रकल्प चालू असताना तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हान यांनी या कोशाचा कामाची दखल घेऊन स्तुती केली होती. आणि आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठी भाषा दिनानिमित्य राज्य मराठी विकास संस्थेच्या वाङ्मय पुरस्कार सोहळ्यात वर्‍हाडी बोलीच्या कोशाचा उल्लेख केला. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख व सर्व कार्यकारीणी सदस्य तसेच श्री शिवाजी महाविद्यालय अकोला विकास समिति चे सर्व सन्माननिय सदस्य व महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी डॉ विठ्ठल वाघ यांचे अभिनंदन केले आहे.

Previous articleतर… पश्चिम विदर्भात शिवसेनेचं चांगभलं ?
Next articleकमळनाथ संस्थानचा यात्रा महोत्सव रद्द

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here