खामगाव: शहरात गेल्या २४ तासात विद्यार्थ्यासह युवकाने अशा दोन आत्महत्या झाल्याचे उघड झाले आहे. येथील शिवाजी फैलातील रहिवासी श्रीरंग पांडुरंग गोरे (वय १८) याने राहत्या घरात छताच्या लोखंडी अँगलला नायलॉन दोरीच्या सहाय्याने आत्महत्या केल्याचे आज सकाळी ९.३० वाजता उघड झाले. श्रीरंगला वडील नसून तो त्याच्या आत्यासोबत व एका बहिणीसोबत खामगावात राहत होता. त्याची आई व लहान बहिण शेगाव येथे राहत आहे. त्याच्या घराच्या दुरुस्तीचे काम सुरु होते. दरम्यान आज सकाळी त्याने आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येमागील कारण समजू शकले नाही. पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. तर दुसºया घटनेत भुपेश रतनलाल हिरकाने (वय ४०) रा. राठी प्लॉट गोरक्षणरोड खामगाव यानेही आत्महत्या केल्याची माहिती वैद्यकीय सुत्रांनी दिली आहे. शहरासह जिल्हयात आत्महत्यांच्या घटनेत वाढ झाल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे १० सप्टेंबररोजी आत्महत्या प्रतिबंध दिन होता. गेल्या १० दिवसांमध्ये जिल्ह्यात १५ जणांनी आत्महत्या केल्याचे धक्कादायक वास्तव आहे.