पूजा चव्हाण मृत्यु प्रकरण
सार्वजनिक जीवनातल्या लोकांना चारित्र्य आणि स्वत:ची निष्कलंक छबी तयार करताना किंवा ती जपताना तारेवरची कसरत करावी लागते. या क्षेत्रातील व्यक्तींना बदनाम करण्याची शेवटची दोन अस्त्रे असतात ती स्त्री किंवा पैसा. जेव्हा एखादी व्यक्ती कोणत्याच प्रभावाला बळी पडत नसते तेव्हा अशा अस्त्रांचा वापर विविध यंत्रणांमार्फत केला जातो.
गेल्या आठ दिवसांपासून आघाडी सरकारमधील वनमंत्री संजय राठोड यांचे नाव पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात सातत्याने गाज आहे. बीड जिल्ह्यातील परळी येथील राहणारी पूजा लहू चव्हाण ही 22 वर्षीय तरुणी काही दिवस पुण्यात भावाकडे राहायला गेली असताना रविवारी 7 तारखेला घराच्या गच्चीवरून पडून तिचा मृत्यू झाला. तिने आत्महत्या केली असावी असा प्राथमिक संशय असतानाच या प्रकरणाशी संबंधित एकापाठोपाठ अकरा ध्वनी संवादाच्या फिती सोशल मीडियावर व्हायरल झाल्या. त्यातील काही संवादात शिवसेनेचे वनमंत्री संजय राठोड यांचा आवाज असल्याचे प्रथमदर्शनी जाणवते.
मयत तरुणी आणि संजय राठोड एकाच समाजाचे असणे हा कदाचित योगायोग असू शकतो मात्र संवादातून जी भीती आणि काळजी मंत्री राठोड यांच्या तोंडून व्यक्त होतेय ती कशाचे द्योतक आहे? काहीही करा आणि मुलीचा मोबाइल, लॅपटॉप ताब्यात घ्या, असा काळजीचा सूर या संवादात मंत्री राठोड यांच्या तोंडून निघताना दिसत आहे. अर्थात हा आवाज नेमका मंत्री राठोड यांचा आहे की अन्य कुणाचा यावर मात्र पोलिस तपासात काही अधिकृत बाहेर येऊ शकले नाही.
व्हायरल झालेल्या ध्वनी फिती कुणी आणि का व्हायरल केल्या असाव्यात? हा प्रश्न यात महत्त्वाचा आहे. एखाद्याचा आवाज कुणाशी साधर्म्य साधणारा असूही शकतो हे क्षणभर गृहीत धरले तर काही प्रश्न पुन्हा निर्माण होतात. गेली आठवडाभर भाजपच्या चित्रा वाघ यांच्यासह अनेकांनी राठोड यांचे थेट नाव घेऊन जे आरोप केले आणि वाहिन्यांवर जो काही राठोड यांच्या नावाने शिमगा सुरू आहे त्याचा प्रतिवाद संजय राठोड यांनी समोर येऊन आजवर का केला नाही?
राजकीय क्षेत्रातील व्यक्तींवर असे आरोप अनेकदा होतात. ज्यांच्यावर आजवर झालेत ते सगळेच काही धुतल्या तांदळासारखे असतात असेही नाही, मात्र असा एखादा आरोप संपूर्ण राजकीय कारकीर्द संपुष्टात आणू शकतो हे लक्षात घ्यायला हवे. संजय राठोड हे दारव्हा-दिग्रसचे गेली तीन-चार टर्म आमदार आहेत. कामाचा झपाटा आणि वाडी, तांड्यांवर सेनेचे संघटन पोहोचण्यात त्यांचा हातखंडा आहे. कामाचा उरक आणि आक्रमक शैली जपून काम करणार्या राठोडांच्या भोवती असे बालंट आल्यावर समाजाचा एकमेव मंत्री म्हणून बंजारा समाज त्यांच्या पाठीशी उभा राहणे स्वाभाविक असले तरी समाजाकडून जे इशारे माध्यमांसाठी जारी केले जात आहेत ते योग्य नाहीत. जोवर एखाद्या प्रकरणात तपासातून काही बाबी उघड होत नाहीत तोवर कोणत्याही समाजाने अशी अंधपणे कुणाची बाजू घेता कामा नये.
माध्यमातून ज्या पद्धतीने संजय राठोड यांच्या नावाची चर्चा सुरू आहे ती काही अचानक सुरू झाली नाही. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी थेट राठोड यांचे नाव घेऊन आरोप करायला सुरुवात केल्यावर माध्यमांना राठोड यांचे नाव घेण्यासाठी मोठा आधार मिळाला हे लक्षात घ्या. माध्यमातून नाव यायला सुरुवात झाल्यावर सुद्धा संजय राठोड समोर येऊन त्यावर काही बोलत नसतील तर त्यांच्याबाबत संशयाचे धुके अधिक गडद होत जाईल हे त्यांच्या कसे लक्षात येत नाही?
धनंजय मुंडे यांचे असेच प्रकरण ताजे असताना संजय राठोड त्याच प्रकरणात चर्चिले जाणे यावरून राजकीय चारित्र्याला महत्त्व देणार्या बहुतांश लोकांना वाईट वाटले. राजकारणातील लोक असेच असतात, हा समज त्यातून बळकट व्हायला लागला आहे. भाजपकडून ओबीसी नेत्यांना मुद्दाम अडकवले जात आहे असाही नवा शोध याप्रकरणी लावला जात आहे. अर्थात यात किती तथ्य आहे हे तपासांती बाहेर येईलच मात्र तोवर मंत्री संजय राठोड यांनी तरी माध्यमांपुढे येऊन स्वत:ची भूमिका स्पष्ट करायला हवी. त्यातूनच दुध का दुध… व्हायला मदत होर्हल आणि त्यांची बाजू कितपत लावून धरायची याचाही निर्णय समाजाला घेता येईल.
पुरुषोत्तम आवारे पाटील
संपादक, अजिंक्य भारत, अकोला
संवाद – 9892162248