व-हाड दूत न्युज नेटवर्क
अकोट: तालुक्यातील रुद्रम मिलिंद झाडे या कृषी पदवीधर तरुणाने शेतात प्रयोग म्हणून काळा गहू पेरला आहे. त्याच्या प्रयोगाचे कुतुहल म्हणून इतर शेतक-यांनी देखील काळ्या गव्हाचा पेरा केला. आकोलखेड शिवारातील शेतात अर्ध्या एकरावर काळ्या गव्हाची लागवड केली.
समाज माध्यमांचा व्यवस्थित उपयोग केल्यास त्यातून नवी वाट गवसू शकते हे रुद्रम झाडे याने दाखवून दिले. यूट्यूबवर त्याने एक व्हिडिओ पाहिला.यात त्याला काळ्या गव्हाच्या लागवडीची माहिती मिळाली. हा गहू सामान्य गव्हापेक्षा पौष्टिक असून त्याने याबद्दल अधिक माहिती घेतली. तेव्हा, त्याला पंजाबच्या नॅशनल ॲग्री-फूड बायोटेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूटच्या डॉ. मोनिका गर्ग यांनी हा गहू शोधल्याचे कळले.
काळा गहू मधूमेहींसाठी गुणकारी
काळ्या गव्हात सामान्य गव्हापेक्षा 60 टक्के जास्त लोह आहे तसेच इतर प्रथिने आणि पोषक घटक देखील असतात. तसेच हा गहू शुगर असणा-यांसाठी फायद्याचा असल्याची माहिती आहे. सामान्य गव्हापेक्षा काळा गहू हा एक आयोग्यदायी पर्याय म्हणून समोर येत आहे.
पंजाबमधून आणले बियाणे
रुद्रम याने काळ्या गव्हाचे बियाणे पंजाब येथून आणले असून इतर शेतक-यांना तो बियाणे उपलब्ध करुन देतो. त्याच्याकडे आतापर्यत कोल्हापूर, इगतपुरी,नाशिक,सांगली, जयसिंगपूर येथील शेतक-यांनी काळ्या गव्हाचे बियाणे लागवडीसाठी नेले आहे. तर आकोलखेड शिवारात शेतक-यांनी या गव्हाच्या बियाण्यांची लागवड करत मागणी केली आहे.