व-हाड दूत न्युज नेटवर्क
पंढरपूर-सांगोला रोडवरील ७ वा मैल कासेगावजवळ शुक्रवारी सकाळी सहा वाजताच्या सुमारास एक भीषण अपघात झाला. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर बोलेरो जीप जाऊन आदळली. या धडकेत पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर ११ जण गंभीर जखमी झाले.
कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड येथील भाविक दर्शनासाठी पंढरपूरला येत होते. पहाटे सहाच्या सुमारास तालुक्यातील कासेगाव जवळील सात मैल या ठिकाणी एक ट्रक थांबलेला होता. चंदगडवरून आलेल्या भाविकांची बोलेरो कार ट्रकला जोरात धडकली. अपघात इतका भीषण होता की पाच जण जागीच ठार झाले. तसेच, ११ जण गंभीर जखमी झाले अशी माहिती पंढरपूर तालुका ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी दिली. जखमींवर उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करण्यात आले मात्र पुढील उपचारांसाठी सर्वांना सोलापूर येथील रूग्णालयात हलविण्यात आले आहे.