वर्हाड दूत न्यूज नेटवर्क
लोणार : लोणार हे जागतिक कीर्तीचे नावारूपास आलेले सरोवर असून याची जबाबदारी वन्यजीव अभयारण्याकडे सोपवलेली आहे. गेल्या तीन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट देऊन लोणार सरोवराचा सर्वांगीण विकास करण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर 8 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6:30 वाजेदरम्यान कमळजा मातेच्या वरच्या बाजूला वन्यजीव अभयरण्यामध्ये आग लागली. याबाबतची माहिती नागरिकांनी वन्यजीव अधिका-यांना कळविल्यानंतर वन्यजीव अधिकारी सक्रिय झाले. अधिका-यांच्या हलगर्जीने ही आग लागल्याची चर्चा आहे. सरोवरामध्ये कोणत्याच प्रकारचे ज्वलनशील पदार्थ नसताना तसेच मानवास बंदी असताना सुद्धा लोणार सरोवरास आग कशी लागते हे एक प्रश्नचिन्ह आहे. यामध्ये वन्यजीव अधिकारी हे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याचे मत पर्यटन प्रेमी व्यक्त करीत आहेत. तसेच याबाबत नगरपालिका, अग्निशमन यांना माहिती दिल्यावरही टाळाटाळ करण्यात आली. वन्यजीव अधिका-यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र यामध्ये सरोवरातील लाखो रुपयांची जीवितहानी झाली असण्याची शक्यता आहे.