वर्हाड दूत न्यूज नेटवर्क
वाशीम : तळहाताच्या फोडाप्रमाणे चिमुकल्यांना जपून त्यांना नोकरीवर लावणा-या जन्मदात्यांना मात्र, वृद्धापकाळात वेगळाच अनुभव येतो. अनेक कर्मचारी आपल्या वृद्ध आई-वडिलांचा सांभाळ न करता त्यांना वृद्धाश्रमात पाठवितात हे विदारक चित्र संस्कृतीला लाजवणारे आहे. त्यामुळे आई-वडिलांचा सांभाळ न करणा-या नोकरदारांचे 30 टक्के वेतन आई-वडिलांच्या खात्यात जमा करण्याचा ठराव वाशीम पंचायत समितीच्या सभापती रेश्मा गायकवाड यांनी जिल्हा परिषद च्या सर्वसाधारण सभेत मांडला होता. हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
त्यामुळे आई-वडिलांचा सांभाळ न करणा-या नोकरदारांचा 30 टक्के पगार आई-वडिलांच्या खात्यात वळता करणारी वाशिम जिल्हा परिषद ही राज्यात पहिली ठरली आहे.
हा ठराव पटलावर येताच सर्वांनी या ठरावाला पाठिंबा देत सर्वानुमते तो ठराव मंजूर केला. या ठरावाबाबत जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते यांनी सभापती रेश्मा गायकवाड व सर्वांचे तोंड भरून कौतुक केले. हा ठराव मंजूर करणारी वाशीम जिल्हा परिषद ही राज्यात पहिली असल्याचे समजते.