वर्हाड दूत न्यूज नेटवर्क
वाशीम: शिक्षण आणि साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल वाशिम जिल्ह्यातील शिरपूर येथील नामदेव चंद्रभान कांबळे यांना पद्मश्री पुरस्कार जाहिर झाला आहे. या पुरस्काराबदद्ल नामदेव कांबळे यांनी आभार मानले असून साहित्य क्षेत्रात आतापर्यंत केलेल्या कामाचे मुल्यमापन झाले असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
नामदेव कांबळे हे शेतमजूराच्या कुटूंबात जन्मले. १९६७ मध्ये त्यांनी शालांत परिक्षा उत्तीर्ण केली. विज्ञानशाखेला जाऊन डॉक्टर होण्याची त्यांची महत्वाकांक्षा होती. मात्र नागपूरला शास्त्रीय आर्युविज्ञान महाविद्यालयात एमबीबीएसच्या पहिल्या वर्षी कौटूंबिक अडचणींमुळे त्यांच्यावर शिक्षण अध्यार्वरच सोडून देण्याची वेळ आली. पुढे १८७५ मध्ये वाशिमच्या राणी लक्ष्मीबाई कन्याशाळेत वॉचमन म्हणून त्यांनी नोकरी केली. दोन वर्षांनी प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून बढती मिळाली. त्याचवर्षी नागपूर विद्यापीठातून त्यांनी मराठी विषयात बि.ए. केले. नंतर बिनपगारी रजा घेवून अकोला येथील महाविद्यालयातून बीएडचे प्रशिक्षण घेतले. १९७९ मध्ये त्यांनी कन्या शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून नोकरीला लागले. पुढे माध्यमिक शिक्षक बढती मिळाली. त्याच संस्थेतून २००५ मध्ये ते सेवानिवृत्त झाले. नोकरी करीत असतानाच विविध वृत्तपत्रांतून व नियतकालीकातून त्यांनी स्तंभलेखन, वार्तांकन, ललीत लेखन केले. त्यांच्या राघववेळ या कादंबरीसाठी १९९४ मध्ये त्यांना राज्यसरकारचा आणि १९९५ मधअये साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. आतापर्यंत ८ कादंब-या, दोन कथासंग्रह, चार कवितासंग्रह, दोन ललीत लेखसंग्रह, एक भाषणसंग्रह, एक समिक्षाग्रंथ आदी विविध साहित्य प्रकाशित झाले. त्यांच्या वेगवेगळ्या पुस्तकांना विविध साहित्य संस्थाकडून व सामाजिक संघटनाकडून पुरस्कार मिळाले आहेत. २००८ मध्ये साहित्य अकादमीतर्फे त्यांना रायटर्स रेसिडन्स फेलोशिप मिळाली आहे.
२०१८ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे जीवनगौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. आजपर्यंत विविध विभागस्तरीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष राहिले आहेत. बालभारती, राष्ट्रीय पुरस्कार न्यास, अण्णाभाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समिती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने समितीचे ते सदस्य राहिले आहेत.
विविध विद्यापीठामधील मराठी विभागातील विद्यार्थ्यांकडून या साहित्यीकाच्या कादंब-यावर एमफिलसाठी संशोधन व त्यांच्या व्यक्तीमत्वावर व साहित्यावर एकूण पाच जणांना पीएचडी पदवीही मिळाली हे विशेष.