रक्त पेढी प्रमुखाला २ हजार रुपये दंड
व-हाड दूत न्युज नेटवर्क
अकोला: ई-रक्तकोष तसेच रक्त संक्रमण परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध रक्तसाठयाची नियमित माहिती अपडेट न केल्याने जिल्हा स्त्री रुग्णालय प्रशासनाला रक्त संक्रमण परिषदेने फटकारले आहे. याप्रकरणी रक्त संक्रमण अधिका-याला जाब विचारत रक्तपेढीला २ हजार रुपये दंड सुनावला आहे.
नागरिकांना रक्तपेढ्यामधील रक्तसाठ्याविषयी अद्ययावत माहिती उपलब्ध होण्यासाठी केंद्र सरकारने ई – रक्तदोष प्रणाली अस्तिवात आणली आहे. मात्र याकडे जिल्हा स्त्री रुग्णालय प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे उघड झाले. यासंदर्भात वारंवार सुचना देवूनही जिल्हा स्त्री रुग्णालयातील रक्तपेढीमार्फत आवश्यक माहिती अपडेट न केल्याने राज्य रक्त संक्रमण परिषदेने रक्तपेढीला दोन हजार रुपयाची दंडात्मक कारवाई केली आहे. ही रक्कम नेमकी कुणाच्या वेतनातून कपात करावी याबाबत वैद्यकीय अधिक्षिका डॉ. आरती कुलवाल यांची वरिष्ठांशी चर्चा सुरु आहे.