व-हाड दूत न्युज नेटवर्क
बुलडाणा: लॉकडाऊनच्या काळातील वाढीव बिलाच्या वसुलीच्या पार्श्वभूमीवर वीज कनेक्शन कापण्यास सुरुवात करण्यात आली आहे. मात्र, स्वाभिमानी शेतकरी संघटना वीज विभागाला असे करू देणार नसून वेळप्रसंगी कनेक्शन कापण्यासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्याला ठोकून काढेल. त्यांचे कपडे फाडू व आठवड्याभरात निर्णय न घेतल्यास उर्जामत्र्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी दिला.
ऊर्जा खात्याने घुमजाव केल्याचा आरोप
वीज मीटर रीडिंग न घेता अंदाजे काढण्यात आलेल्या वाढीव वीजबिलांमुळे हैराण झालेल्या ग्राहकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने एक प्रस्ताव तयार केला होता आणि त्यानंतर ग्राहकांना दिलासा देऊ, अशी घोषना सुद्धा करण्यात आली होती. मात्र, आता ऊर्जा खात्याने घुमजाव केला असून बिलाच्या वसुलीसाठी वीज कनेक्शन कापण्याचा ऊर्जा खात्याने आदेश काढलेला आहे. त्याचा आम्ही निषेध करतो. एकतर लॉकडाऊनच्या काळातील वीज बिलसंदर्भात ऊर्जा खात्याने वेळो-वेळी आपल्या भूमिका बदललेल्या आहे. ग्राहकांना अंधारात ठेवलेले आहे. अवाच्या-सव्वा बिल सामान्य ग्राहकांना भरणे कठीण आहे, म्हणून राज्य सरकारला आमचे सांगणे आहे. ताबडतोब आठवड्याभरात जे काही वाढीव बिल आले असतील त्यामध्ये सवलत देण्याचा निर्णय सरकारने घेतला पाहिजे, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी सांगितले.