बुलडाणा : बर्डफ्ल्यूच्या अफवेमुळे पोल्ट्री व्यवसायाला मोठा आर्थिक फटका बसत आहे. बुलडाणा जिल्ह्यात अजून बर्ड फ्ल्यूची लागण झालेली नाही. मात्र वेगवेगळ्या अफवांनी पोल्ट्री व्यावसायिक अडचणीत आले आहेत. या अफवा खोट्या असून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आज शुक्रवारी जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्यावतीने चिकन फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला असून चिकनप्रेमींनी चिकनचा आस्वाद घेतल्याचं आयोजकांच्या वतीने सांगण्यात आलं.