व-हाड दूत न्युज नेटवर्क
अकोला: सध्या बर्ड फ्लू बाबत कुक्कुटपालकांमध्ये आणि सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे, मात्र ज्या विषाणूच्या संसर्गाने सध्या कोंबड्यांमध्ये काही ठिकाणी बर्ड फ्लू झाल्याचे दिसून येत आहे, तो विषाणू मानवास सर्व सामान्यपणे रोगबाधित करत नसल्याने काळजीचे कारण नाही. मूलतः बर्ड फ्लू हा पक्षांचा रोग असून मानवाचा नाही असे मत प्रा. डॉ. आशिष पातुरकर, कुलगुरू, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर यांनी व्यक्त केले.
स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला यांचे वतीने “बर्ड फ्लू आहे तरी काय, वस्तुस्थिती आणि शंका निरसन” या विषयावर आयोजित ऑनलाईन व्याख्यानाचे उदघाटन प्रसंगी बोलत होते. या प्रसंगी डॉ. धनजंय परकाळे, मा. अतिरिक्त आयुक्त, पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र राज्य ,प्रा. डॉ. विलास आहेर, संचालक विस्तार शिक्षण, माफसू, नागपूर यांचेसह व्याख्याते प्रा. डॉ. नितिन कुरकुरे, संशोधन संचालक,माफसू, नागपूर; प्रा. डॉ. अजित रानडे, सहयोगी अधिष्ठाता, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, मुंबई डॉ अनिल भिकाने सहयोगी अधिष्ठाता तसेच नॉलेज पार्टनर आलेम्बिक फार्मा लिमिटेड यांचे वतीने उपस्थित श्री. पी. करुणानिथी, सिनियर व्हाईस प्रेसिडेंट,ऑनलाईन उपस्थित होते. बर्ड फ्लू चा समाज माध्यमावर होत असलेल्या अपप्रचारास आणि भुलथापास सामान्य नागरिकांनी बळी पडू नये म्हणून लोकप्रबोधनाहेतू सदर व्याख्यानाचे आयोजन केल्याचे कार्यक्रम संयोजक डॉ.भिकाने, यांनी आपल्या प्रास्ताविकात नमूद केले.
व्याख्याते डॉ. कुरकुरे यांनी शास्त्रज्ञाच्या दृष्टिकोनातून बर्ड फ्लू विषाणूचा होणार प्रसार,लक्षणे आणि निदान याबाबत भाष्य करताना त्याचबरोबर सध्या पक्षांमध्ये असलेला बर्ड फ्लूचा विषाणू मानवास अजिबात संसर्ग करण्याची क्षमता नसलेला असून त्यामुळे सामाजिक स्वास्थ्य जपण्यासाठी अंडी, चिकन उकळून अथवा शिजवून खाल्यास कुठलाही अपाय होत नसल्याचे सांगितले. डॉ. रानडे यांनी कुक्कुटपालन क्षेत्राचे रोजगार आणि अन्नसुरक्षेत असलेले लक्षणीय योगदान आपल्या व्याख्यानात सांगितले त्याचबरोबर कुक्कुटपालकांनी आपल्या प्रक्षेत्रावर स्वच्छता राखत इतर प्रजातीचे स्थलांतरित व वन्य पक्षी प्राणी येणार नाहीत याची काळजी घेण्याचे आवाहन केले. जैवसुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून निर्जंतुकीकरण आणि प्रतिबंधित क्षेत्र याबद्दल माहिती दिली. ऑनलाईन व्याख्यानानंतर विविध नागरिकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना दोन्ही व्याख्यात्यांनी समर्पक उत्तरे देत त्यांचे शंका निरसन केले. बर्ड फ्लू आजार पक्षांपासून थेट मानवाला होण्याची शक्यता अत्यंत कमी असली तरी खबरदारीचा उपाय म्हणून कच्चे चिकन वा अंडी न खाणे तसेच नाकातून स्त्राव येत असलेल्या किंवा मृत पक्षांना न हाताळता जवळच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यास संपर्क करण्याचे आवाहन डॉ. परकाळे यांनी आपल्या भाषणात केले. समारोपीय भाषणात डॉ. आहेर यांनी समाज प्रबोधन हेतू आयोजित सदर उपक्रमाबाबत संस्थेचे अभिनंदन केले. कार्यक्रम समन्वयक प्रा डॉ सुनील वाघमारे, चिकित्सालयीन अधिक्षक, यानी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले तर प्रा. डॉ. सतीश मनवर, विभागप्रमुख कुक्कुटपालन शास्त्र यांनी आभार प्रदर्शन केले. सदर ऑनलाईन व्याख्यानासाठी सह समन्वयक म्हणून डॉ. किशोर पजई, डॉ. मंगेश वडे यांचेसह डॉ. गिरीश पंचभाई, डॉ. प्रवीण बनकर व डॉ.संतोष शिंदे, आलेम्बिक फार्मा यांनी परिश्रम घेतले.
सदरिल वेबीनारमध्ये महाराष्ट्र भरातून सामान्य नागरीक, कुकुटपालक, विद्यार्थी तसेच पशुसंवर्धन क्षेत्रातील अधिकारी कर्मचारी झुमवर तसेच वेगवेगळ्या फेसबुक पेजवर मोठ्या संख्येने ऑनलाईन उपस्थीत होते.