वर्हाड दूत न्यूज नेटवर्क
शेगाव:ग्रामपंचायत निवडणुकीचे राजकीय वातावरण तालुक्यात चांगलेच तापले आहे. निवडणूक असलेल्या गावातील प्रत्येक वॉर्डामध्ये राजकीय धुराळा उडू लागला आहे. उमेदवार आपापल्या परीने प्रचारात गुंतले आहेत. आपली उमेदवारी गावाच्या भल्यासाठी असल्याचे पटवून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. यावर्षी बहुतांश ग्रामपंचायतीमध्ये तरूण निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे नवे तंत्रज्ञान अवलंबले जात आहे. आपल्या जवळचे, दूरचे कोण यांचा अंदाज लावला जात आहे. आपल्याकडील कार्यकर्ते दुसरीकडे भटकू नये यासाठी बॅनरवर जवळपास सर्वांचेच नाव व फोटो छापण्याचा प्रयत्न उमेदवार करत आहेत. विशेष म्हणजे अनेकांनी पक्षाचे झेंडे बाजूला ठेवून आपल्या सोयीच्या उमेदवाराचा प्रचार करणे सुरू केले आहे. दरम्यान गावातील काही उमेदवार मतदारांना खुश करण्यासाठी विविध प्रलोभन दाखवित असल्याचे दिसत आहे. निवडणूक गावात खर्च शहरात ग्रामपंचायतची निवडणूक ग्रामीण भागात होत असली तरी अनेक उमेदवार कार्यकर्त्यांना सांभाळताना दिसत आहेत.