जय जिजाऊ …
मध्ययुगात जवळपास पाचशे वर्षांच्या अनियंत्रित अत्याचाराचा, गुलामगिरीचा अतिशय निश्चय पूर्वक शेवट करुन तत्कालीन हिंदुस्तानच्या इतिहासात ज्यांनी स्वातंत्र्याचा पहिल्यांदा अश्वमेध केला त्या ‘स्वराज्य संस्थापक’ छत्रपति शिवाजी महाराजांना प्रत्येक संकटाशी सामना करण्याचे कसब जीने अखंड सावधान राहून निर्माण केलं त्या जिजाऊंना इतिहासाने स्वराज्य संकल्पिका म्हणून गौरविले ते योग्यच!
जिजाऊ म्हणजे मध्ययुगीन काळाने भारताला दिलेली एक अनमोल भेट! देवगिरीच्या यादवांचे वंशज म्हणजे सिंदखेडचे जाधव. त्या जाधव कुळात लखुजीराव आणि म्हाळसाबाई यांच्या पोटी जन्मलेली ही तेजस्विनी! 12 जानेवारी 1598 ची ती क्रांतिसूर्याची सोनेरी किरणे महाराष्ट्राला काही वेगळाच संदेश देत होती. अख्या सिंदखेड्यात राजे लखुजीरावांनी जिजाऊ जन्मावेळी हत्तीवरून साखर वाटली होती. चार भावांच्या पाठीवर झालेली ही चंद्रज्योती मोठी लाडाची! चंद्राच्या कलांनी मोठी होणारी जिजाऊ काही कळायच्या आतच भोसल्यांची सून आणि शहाजी राजांची पत्नी झाली. आणि इथेच महाराष्ट्राचे,तत्कालीन हिंदुस्तानचे भाग्य पालटले!
शिवरायांचे बालपण
थोरला पुत्र संभाजीच्या पाठीवर पाच सहा वर्षांनी शिवबा जन्मले. शहाजी- जिजाऊंनी आपल्या पुत्रांचे उत्तम संगोपन केले. बालपणीचे शिक्षण, विविध कला, भाषा, विज्ञान, इतिहास, भूगोल, नीती, शास्त्र, शस्त्र,विद्या, राजनीती या सर्व ज्ञानशाखामध्ये परिपूर्ण करुन एक उत्तम, जागरूक, निर्भय लढवय्या,जनाताभिमुख राजकुमार म्हणून संस्कारित केले.
स्वराज्य निर्मितीचा संकल्प
शहाजी राजे हे दक्षिणेतील एक मातब्बर, शक्तिशाली सेनापती आणि थोर राजनीती धुरंधर होते. त्यांच्या हृदयात विजयनगरच्या स्मृती तेवत असाव्यात.म्हणूनच त्यांच्या अंत:र्मनात स्वातंत्र्याची लालसा तीव्र झाली होती. त्यांच्या सामर्थ्याविषयी मोगलशाही,निजामशाही, आदिलशाही दचकून होती. त्याच कारणामुळे त्यांना महाराष्ट्रापासून दूर कर्नाटकात पाठविले होते. तेथेही त्यांनी बंगळूर ते तंजावर पर्यंत आपली सत्ता स्थापून स्वतंत्र राजासारखा कारभार पाहिला. शिवराय बारा वर्षाचे असताना त्यांना पुण्याच्या जहागिरीचा कारभार पाहण्यासाठी जिजाऊंसह पाठविले. जिजाऊंनी अतिशय धीरोदात्तपणे, खंबीरपणे आपल्या जहागिरीतील आदिलशाही सरदारांची झुंडशाही नियंत्रणात आणली. आपल्या वडिलांचा म्हणजे लखुजीराव जाधव आणि सख्ख्या भावांचा निजामशहाने विश्वासघाताने, अतिशय निर्दयपणे केलेला संहार तसेच रक्ताचे नाते असलेले मराठे वीर वतनाच्या तुकड्यापायी आपसात झगडत. हे पाहून जिजाऊ दुःखी झाल्या. म्हणून त्यांनी स्वराज्याचा संकल्प केला. त्यासाठी शिवबाला सर्व परिने तयार केले. रयतेचे राज्य निर्माण करण्याचा संकल्प शिवबाकरवी पूर्ण करण्याचे ठरविले. जिजाऊंनी पुण्यात सोबतीला असलेले कारभारी, वतनदार व सामान्य प्रजा यांच्यात समन्वय स्थापून लोकराज्याचा श्रीगणेशा केला. सन १६२९ मध्ये आदिलशाही सरदार मुरार जगदेव याने गाढवाचा नांगर फिरवून उध्वस्त केलेले पुणे जिजाऊंनी शिवबाकरवी सोन्याचा नांगर कसून पवित्र केले आणि जनतेला आश्र्वस्त केले. अनियंत्रित राजसत्तेला प्रतीआव्हान दिले! जिजाऊंनी शेतीसाठी, पिण्याच्या पाण्यासाठी आंबवडी, पुनवडीची धरणे बांधून घेतली. रयतेला सुरक्षिततेची हमी दिली. श्रीकृष्णाने गायी चारणाऱ्या सर्व जातीच्या शेतकरी गवळयांची मुले एकत्रित करून त्यांच्या शिदोर्यांचा एकत्रित काला केला व सर्वांनी जसे सोबत सहभोजन केले.त्यांच्यामध्ये समता, एकीची भावना वाढीस लावली तशीच शिकवण जिजाऊंनी शिवरायांना दिली. त्यांनी शिवबांना अठरापगड जातींच्या मुलामध्ये मनमोकळे पणाने वावरू दिले. खेळू दिले. खाऊ दिले. अशाप्रकारे जिजाऊंच्या समतावादी लोकाभिमुख संस्कारातून शिवबाचे संवेदनशील, तेजस्वी,आकर्षक, जादूई व्यक्तिमत्त्व घडत गेले. जहागीरदाराचा पुत्र ही आपली ओळख विसरून शिवबा शेतकरी, आदिवासी, कोळी, कातकरी, हेटकरी, भिल्ल, महार, मांग, लोहार मुसलमान, मराठे, कुणबी अशा विविध जातीधर्माच्या मुलांमध्ये तासनतास रमत. रयतेचे दुःख, दारिद्रय यातून पहायला मिळे. जिजाऊ सुद्धा गाव-वस्ती, वाडी- पाड्यावर जाऊन लोकांच्या अडचणी समजून घेत. त्यामुळे रयतेला जिजाऊ नेहमी आपल्यातीलच वाटत असत.
पतिव्रता जिजाई
सामान्य बहुजन रयतेच्या सुख- समृद्धीसाठी, त्यांच्या सुखी संसारासाठी जिजाऊंनी आपल्या वैयक्तिक संसाराचा मात्र वनवास केला. बारा वर्षाच्या शिवबाला घेऊन जिजाऊ शहाजी राजांचा निरोप घेऊन निघाल्या. परत हया तेजस्वी साध्वीची भेट जवळ्पास एकवीस वर्षांनी सन 1663 मध्येच आपल्या पतीशी झाली. एकवीस वर्षांच्या खंडानंतरही ह्या पतीपत्नीचे प्रेम हे अमर्याद पवित्र होते. तीच निष्ठा त्यांनी शिवबामध्ये पेरली. जिजाऊंनी शहाजीराजांचे कर्तृत्व हेच शिवबांचे प्रेरणास्रोत ठरविले. म्हणूनच दोन तपांच्या प्रचंड विजनवासानंतर जेंव्हा शहाजी राजे महाराष्ट्रात येतात. विजयी, पराक्रमी पुत्रास भेटतात. तेंव्हा दोघेही पितापुत्र आनंदाश्रुच्या महापुरात परस्परांना कडकडून मिठी मारतात. अनन्य भावाने आपल्या बापाचे म्हणजे शहाजी राजांचे पायातील जोडे हा दिग्विजयी पुत्र आपल्या छातीशी कवटाळून शहाजी राजांच्या पालखीच्या पुढे पायी चालतो. हा पितृभक्तीचा अनोखा नजारा पाहून उपस्थीत रयत, सैनिक, सरदार, मंत्री सद्गदित झाले. भारावून गेले. धन्य झाले. असे संस्कार जिजाऊंनी शिवबावर केले होते. जिजाऊ आणि शहाजी राजे यांच्या परस्पर प्रितीचे, त्यांच्या गुणवैशिष्टयांचे वर्णन शहाजी राजांच्या दरबारातील कविश्रेष्ठ जयराम पिंड्ये यांनी अतिशय समर्पक शब्दात केले आहे…
”जशी चंपकेशी खुले फुल जाई
भली शोभली ज्यास जाया जिजाई
जिचे कीर्तीचा चंबु जम्बु द्विपाला
करी साऊली माऊली मुलाला”
महाराष्ट्र माता
जिजाऊंचे माहेर विदर्भातील सिंदखेड राजा, सासर मराठवाड्यातील वेरूळ तर स्वराज्य निर्माण सह्याद्रीच्या कुशीत पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात! अशाप्रकारे जिजाऊंनी संपूर्ण महाराष्ट्र एकतेच्या धाग्यात गुंफून महाराष्ट्राला स्वातंत्र्याची अखंड प्रेरणा दिली.महाराष्ट्रातील माता भगिनींना जातीभेद विरहित,समतावादी पिढी निर्माण करण्यास प्रत्येक घरात शिवबा सारखा सर्वांना सोबत घेऊन चालणारा पुत्र घडवण्याची साद घालत आहेत.
पुरोगामी जिजाऊ
मुरार जगदेव याने उध्वस्त केलेले पुणे, तेथे लोखंडी पहार त्यावर फाटकी चप्पल, तुटका झाडू, फुटकी कवडी टांगून जो कोणी ह्याला हात लावेल म्हणजेच येथे वस्ती करेल त्याचा निर्वंश होईल अशी धमकी दिली. हया धमकीला भिक न घालता जिजाऊंनी शिवबाकरवी ती पहार उखडून टाकून धार्मिक दहशतवाद आणि शक्तीचा उन्माद गाडून टाकला. बळजबरीने मुसलमान झालेल्या बजाजी निंबाळकर याने स्वधर्मात येण्याची इच्छा व्यक्त केली पण धर्मशास्त्राने त्याची परतीची वाट बंद केली. तेंव्हा पुरोगामी जिजाऊंनी सनातनी धर्ममार्तंडांचा विरोध झिडकारून शिखर शिंगणापूर येथील महादेवाच्या मंदिरात बजाजींना शुद्ध करुन स्वधर्मात घेतलं. तोरणा किल्ल्यात डागडुजी करतांना सापडलेल्या धनात सुवर्ण मुद्रासोबत देवाच्या सुवर्ण मुर्ती सुद्धा होत्या. सुवर्ण मुद्रा स्वराज्यासाठी खर्च केल्या पण सुवर्ण मुर्त्यांचे काय करावे असा प्रश्न शिवबासह कारभा-यांना पडला. तेव्हा जिजाऊ म्हणतात, सुवर्ण मुर्ती वितळवून त्याचा पैसा रयतेच्या कल्याणासाठी वापरा.
स्वराज्यासाठी हिमालया एवढं दुःख पचवणा–या जिजाऊ
सन १६२९ मध्ये ऐन तारुण्यात हत्तीच्या तोलामोलाचा बाप आणि सिंहाच्या छातीचे भाऊ निजामशाही दरबारात निर्दयपणे कापून काढले. हया आभाळ फाटल्यागत दुःखाने त्या पार खचून गेल्या. आयुष्याच्या निर्णायक वळणावर स्वराज्याच स्वप्न अंकुरत असताना सन १६५४ मध्ये कनकगिरीच्या युद्धात ज्येष्ठ पुत्र संभाजीचा मृत्यु आणि सन १६६४ मध्ये कर्नाटकातील होदीगरे येथे झालेला शहाजी राजांचा अपघाती मृत्यू. आता तर जिजाऊ कोसळल्याच… लागोपाठ कूस उजाडण्याच आणि कपाळ पांढरं होण्याचं दुःख जिजाऊंनी ‘ हला हल् सारखं पचवल.स्वराज्याला आधार दिला. शिवबाला मायेचा पदर दिला.
याच साठी केला होता अट्टाहास
तीस वर्षांच्या अखंड परिश्रमातून, अनेक दिव्यातून, जिवलग मित्र,सखेसोबत्यांच्या बलिदानातून हे स्वराज्य जगातील बलाढय मोगलसत्तेला पराजित करुन निर्माण झालं. विधियुक्त धार्मिक आणि राजकीय मान्यता मिळावी यासाठी ६ जून १६७४ रोजी महाराजांनी स्वतःस राज्याभिषेक करून घेतला.शिवराज्याभिषेक ह्या युगप्रवर्तक घटनेचा रोमहर्षक सोहळा हृदयात साठवून ही राष्ट्रमाता कृतार्थ मनाने अवघ्या बारा दिवसांनी १७ जून १६७४रोजी शिवछत्रपतीसह अवघ्या महाराष्ट्राला पोरक्या करुन गेल्या.जिजाऊंना आज जयंतीदिनी नमन…
जिजाऊ साक्षात स्वातंत्र्य देवता
विजयाची गाथा तिचे जिणे
विश्ववंद्य वीर जिने घडविला
तिच्या तपस्येला पार नाही
– संतोष उद्धवराव झामरे,
रोहनखेड ता. अकोट जि. अकोला
मो.क्र. 9922650469