गलवानच्या संघर्षानंतर राजनयीक आणि कूटनीतीच्या पातळीवर चीनची कोंडी करण्यासाठी भारत अधिक सक्रिय झाला आहे. तिकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही चीनविरोधातील आक्रमकता वाढवली आहे. अलीकडेच अमेरिकेची लढाऊ विमाने शांघायनजीक घिरट्या घालताना दिसल्याने चीन बिथरला आहे. रशियानेही चीनला एस-400 प्रणाली देण्यास नकार दिला आहे. भारतासह जगभरातून चीनला होणारा विरोध वाढत चालल्यामुळे चीनची अर्थव्यवस्था डबघाईला येऊ लागल्याचे समोर येत आहे. तरीही चीनची खुमखुमी कमी झाली नाही आणि त्यांचा युद्धज्वर शमला नाही तर जागतिक समुदाय चीनविरोधात मोठे पाऊल उचलण्याची शक्यता नाकारता येत नाही.
——
भारत आणि चीन यांच्यातील युद्धसदृश परिस्थिती अजूनही कायम आहे. पूर्व लडाखमधील संघर्ष अद्यापही संपलेला नाही. कारण अद्यापही काही क्षेत्रातून चीनने आपले सैन्य हटवलेले नाही. लष्करी पातळीवरील चर्चेच्या चार फेर्या होऊनही चीनने सैन्य माघार घेण्याचे संकेत दिलेले नाहीत. त्यामुळे मागील काही दिवस काहीशी सौम्य भूमिका घेणार्या भारताने आता पुन्हा आक्रमक पवित्रा घेतला आहे. चीनला जशास तसे उत्तर द्यायचे ठरवले आहे. चीनने आक्रमण करण्याची हिंमत दाखवली तरीही त्याचा सामना करण्यास भारत पूर्ण तयारीनिशी सज्ज आहे. यासाठी आणि चीनवर सातत्याने दबाव आणण्यासाठी भारत आर्थिक, सामरीक आणि राजनैतिक अशा सर्वच पातळ्यांवर प्रयत्न करत आहे.
लष्करी पातळीवरच्या प्रयत्नांचा विचार करता भारताने अत्याधुनिक रणगाडे, फायटर प्लेन, तोफा अशी कुमक मोठ्या प्रमाणावर पूर्व लडाखमध्ये वाढवली आहे. त्याचप्रमाणे सैन्याची कुमक कायम ठेवली आहे. नुकताच भारतीय वायूदलामध्ये फ्रान्समधून 7000 किलोमीटरचा पल्ला पार करुन आलेली पाच राफेल लढाऊ विमाने दाखल झाली आहे. हे 17 वे स्क्वाड्रन अंबाला इथे तैनात ठेवण्यात आले आहे. एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की, अंबाला ते लेह हे अंतर 450 किलोमीटर आहे; तर राफेलचा वेग हा प्रतितास 1700 किलोमीटर आहे. म्हणजेच, साधारणतः सात ते आठ मिनिटांत राफेल विमान अंबालावरून लेहला पोहोचू शकते. अंबाला हे कमी उंचीवर आहे. त्यामुळे राफेल विमाने लेहच्या पर्वतीय क्षेत्रात ठेवण्यापेक्षा अंबालामध्ये ठेवणे सामरिकदृष्ट्या आपल्याला सुलभ आहे. राफेल विमानाची वाहक क्षमता प्रचंड आहे. त्यामुळे स्फोटके घेऊन उंचावर जाणे सोपे आहे. परंतू उंचीवर जाऊन त्यात स्फोटके भरणे हे गैरसोयीचे आहे. त्यामुळे लेहमध्ये हे स्क्वाड्रन तैनात करण्याऐवजी अंबालाची निवड करण्यात आली आहे. अंबालाहून 500 किलोमीटरच्या क्षेत्रात एलओसी आणि एलएसी आहेत. त्यामुळे दोन्ही फ्रंटवर शत्रुला सामोरे जावे लागले किंवा युद्धाला तोंड फुटले तरी राफेलची सहा विमाने शत्रुचा समाचार घेण्यासाठी सज्ज आहेत. राफेलच्या आगमनाने चीन कमालीचा बिथरला आहे. याव्यतिरिक्त एस -400 ही अँटीबॅलेस्टिक मिसाईल प्रणाली रशियाकडून लवकरात लवकर घेण्याच्या प्रयत्नात भारत आहे. तिकडेे अमेरिकेने प्रिडेटर -बी हे मानवरहित ड्रोन -जे क्षेपणास्त्रांचा हल्ला करू शकते-भारताला देण्याची तयारी दाखवली आहे. मेक इन इंडिया अंतर्गत देशातील उद्योगांकडूनही काही शस्त्रास्रे विकत घेतली जात आहेत. यासंदर्भात फार मोठ्या प्रमाणावरील करार नुकतेच करण्यात आलेले आहेत. याखेरीज राफेलवर तैनात करण्यासाठी हॅमर क्षेपणास्त्र खरेदी करण्यासाठी ‘इमर्जन्सी पर्चेस पॉवर’चा वापरही केला जाणार आहे. त्यामुळे लष्करी पातळीवरील भारताची सज्जता कुठेच कमी नाही.
गलवानच्या संघर्षानंतर राजनयीक किंवा कुटनीतीच्या पातळीवर चीनची कोंडी करण्यासाठी भारताने प्रयत्न सुरु केले. या प्रक्रियेलाही आता अधिक गती दिली जात आहे. रशियाने एस-400 या अँटीबॅलास्टिक मिसाईलची पहिली डिलिव्हरी 2018 मध्ये चीनला दिलेली होती. पण आता दुसरी डिलीव्हरी चीनला देण्यास रशियाने नकार दिला आहे. हा चीनसाठी एक खूप मोठा धक्का ठरला. याबाबत प्रतिक्रिया देताना, रशियाने दबावामध्ये येऊन केलेले हे कृत्य आहे असे चीनने म्हटले आहे. यामध्ये कोणा देशाचे नाव घेतले नसले तरी, त्यांचा सूचक इशारा भारताकडेच होता. रशियाचा हा नकार भारताचा राजनयीक विजय म्हणावा लागेल.
अलीकडेच इंग्लंडच्या राजदुताने चीनवर उघडपणे टीका केली आहे. चीनचे लडाखमधील कृत्ये हा भारतावरील हल्ला आणि आक्रमण आहे. हे विस्तारवादाचे कृत्य असून त्याविरोधात सर्व राष्ट्रांनी एकत्र आले पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे. भारताला मिळालेला हा मोठा पाठिंबा आहे. जपान, ऑस्ट्रेलिया, अमेरिका यांच्याकडून भारताला उघड पाठिंबा मिळतो आहेत. त्यामुळे भारताला चीनची कोंडी करण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर यश येत आहे, असे दिसते.
अमेरिकेने अलीकडेच यूएसएस निमित्झ ही त्यांची सर्वांत बलाढ्य युद्धनौकाअसे मलाक्काच्या सामुद्रधुनीमधून अंदमान, निकोबारमध्ये पाठवली. अंदमान निकोबारमध्ये भारतीय नौदलाबरोबर त्यांच्या साखळी कवायती झाल्या. हा चीनला सज्जड दम होता. हिंदी महासागरामध्ये ज्या पद्धतीने चीन हस्तक्षेप करतो आहे, त्याला रोखण्यासाठी किंवा त्याचा प्रतिकार करण्यासाठी हे खूप मोठे साधन ठरले होते. आता भारत आणि अमेरिका परस्पर सामंजस्याने चीनला घेरण्याच्या प्रयत्नात आहे. त्यासाठी अमेरिकेने आपल्या तीन युद्धनौका चीनच्या आसपास तैनात केल्या आहेत. त्यापैकी एक युद्धनौका फिलिपाईन्सच्या समुद्रात तैनात करण्यात आली आहे. दक्षिण चीन समुद्रात रोनाल्ड रेगन तैनात केली गेली आहे आणि मल्लाका सामुद्रधुनीमध्ये निमित्झ तैनात आहे. हा संपूर्ण मार्ग चीनसाठी व्यापारी दृष्ट्या फार महत्त्वाचा आहे. मल्लाका समुद्रधुनीमधून चीनचा 30-35 टक्के व्यापार होतो. येथूनच दक्षिण चीन समुद्रात जाता येते. तिथेच चीनची नाकेबंदी करण्याचा अमेरिकेचा विचार आहे. त्याचप्रमाणे फिलिपिन्सच्या आणि दक्षिण चीन समुद्रात चीन-अमेरिका यांच्यातील वाद विकोपाला जाताना दिसत आहे. थोडक्यात अमेरिका चीनची नाकेबंदी करण्याच्याच्या प्रयत्नात आहे.
गेल्या आठवड्यात चीनी वाणिज्य दूतावास बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर अमेरिकेची लढाऊ विमाने चीनच्या सीमेवर घिरट्या घालताना दिसली. पी8ए या पाणबुडी संहारक विमानांनी आणि ईपी 3 ई ही विमाने काही काळासाठी शांघायपासून 76.5 किलोमीटरच्या अंतरावर पोहोचली होती. त्यामुळे अमेरिका चीनवर दबाव ठेवण्यासाठी प्रचंड आक्रमक बनला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ऑस्ट्रेलिया, जपान आणि भारत, अमेरिका या चार देशांचा क्वॉड गटही चीनविरोधात सक्रिय झाला आहे. या चारही देशांच्या नौदलाच्या सागरी कवायती लवकरच हिंदी महासागरात अंदमानजवळ होणार आहेत. हा चीनसाठी सज्जड इशारा आणि दम असेल. यातून सागरी मार्गानेही चीनचा सामना करण्यासाठी भारत पूर्णपणे सज्ज आहे, हे स्पष्ट होते. यासाठी मित्र देश भारताला मदत करताहेत. राजनैतिक पातळीवर ही एक अत्यंत महत्त्वाची घडामोड म्हणावी लागेल.
चीनच्या आक्रमकपणाला आर्थिक भक्कमपणाचा पाया आहे. म्हणूनच भारताने चीनच्या आर्थिक नाड्या आवळण्यासाठी आणि चीनला आर्थिक हादरे देण्यासाठी उपाययोजना सुरु केल्या आहेत. काही दिवसांपूर्वी 59 चीनी अॅप्सवर बंदी घातल्यानंतर आणखी 47 क्लोन चीनी अॅप्सवर बंदी घालून भारताने नवा डिजिटल स्ट्राईक चीनवर केला आहे. 59 अॅप्सवर बंदी घातल्याचा मोठा आर्थिक दणका चीनला बसलेलाच होता. आता हा नवा आर्थिक दणका चीनला बसणार आहे. आजघडीला भारतात 30 कोटी मोबाईल फोन्समध्ये चीनी अॅप्स वापरले जात होते. यावरुन त्यातील अर्थकारणाचा अंदाज येईल. जवळपास 100 हून अधिक अॅप्सवर बंदी घालून भारताने चीनला एक प्रतिकात्मक संदेश दिलेला आहे. चीनच्या प्रतिष्ठेला आणि विश्वासार्हतेला जागतिक स्तरावर धक्का देण्याचे काम भारताने या अॅप्सबंदीतून केले आहे. भारत चीनबरोबरचा संघर्ष हा अत्यंत गांभीर्याने घेतो आहे, हेही यातून सूचित करण्यात आले आहे.
दुसरीकडे, जवळपास 200 पेक्षा जास्त चीनी गुंतवणुकीचे प्रस्ताव केंद्रीय गृहमंत्र्यालयाने स्थगित केले आहेत. यापुर्वी चीनकडून येणार्या परकीय गुंतवणुकींना केंद्र सरकारच्या पूर्वपरवानगी गरजेची नव्हती. पण नव्या नियमावलीमुळे हे प्रस्ताव आता रोखले गेले आहेत. भारताने नुकताच असाही निर्णय घेतला आहे की, ज्या करार किंवा कंत्राटामध्ये चीनची निवड झाली ते कंत्राट रद्द करणे. महामार्ग विकास, टेलिकॉम इक्विपमेंटसमधून देखील चीनी कंपन्या कमी झाल्या आहेत. केवळ सरकारी किंवा शासकीय पातळीवरच नव्हे तर आज देशातील उद्योजकही चीनी मालाची आयात कमी करण्यासाठी पुढे सरसावले आहेत. अलीकडेच भारतातील एक मोठे स्टील उत्पादक असणार्या जिंदाल यांनी दोन वर्षात चीनकडून करण्यात येणारी आयात थांबवण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. अन्यही अनेक उद्योजक चीनवर बहिष्कार आणि आत्मनिर्भरतेबाबत सक्रिय झाले आहेत. यामुळे चीन पुरता भेदरला आहे.
कोरोनानंतर जागतिक पातळीवर चीन एकटा पडताना दिसतो आहे. आता संयुक्त राष्ट्र संघाच्या मंचावरही सप्टेंबर महिन्यापासून चीनला घेरण्याची प्रक्रिया भारत सुरू करेल. सप्टेंबरमध्ये संयुक्त राष्ट्र संघाची आमसभा सुरु होत आहे. तेथेही भारत चीनच्या विस्तारवादाबरोबरच अन्य अनेक मुद्दे उपस्थित करुन चीनची कोंडी करणार आहे. भारतासह जगभरातून चीनला होणारा विरोध वाढत चालल्यामुळे चीनची अर्थव्यवस्था डबघाईला येऊ लागल्याचे समोर येत आहे. तरीही चीनची खुमखुमी कमी झाली नाही आणि त्यांचा युद्धज्वर शमला नाही तर जागतिक समुदाय एकजुटीने चीनविरोधात मोठे पाऊल उचलण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- – डॉ. शैलेंद्र देवळाणकर
⚡️ परराष्ट्र धोरणातील व आंतरराष्टीय संबंधातील सर्व चालू घडामोडींविषयी मराठी व इंग्रजीतून माहितीसाठी
डॉ. देवळाणकर यांना ट्विटर वर फॉलो करा.
(@skdeolankar): https://twitter.com/skdeolankar?s=09