वर्हाड दूत न्यूज नेटवर्क
बुलडाणा. शहरातील कारंजा चौकात असलेल्या जिल्हा परिषद शाळेला शुक्रवारी दुपारी अचानक आग लागली. आगीमध्ये शाळेतील जुने रेकॉर्ड तसेच साहित्य जळाले.
गजबजलेल्या चौकात जिल्हा परिषदेची शाळा आहे. या इमारतीत डीएचओ, शिक्षण विभागाचे कार्यालय आहे. या शाळेतील एका खोलीत पोषण आहारा संदर्भातील पाचशे बारदाना ठेवण्यात आला होता. त्या खोलीला आग लागली. खोलीत बारदाना असल्यामुळे काही वेळातच आगीने रौद्ररुप धारण केले होते. या वेळी शाळा खोलीच्या वरच्या छपरामधून आगीचे लोळ उठत होते.
ही घटना लक्षात येताच काही नागरीकांनी आगीची माहिती अग्नीशमन दलाला दिली. अग्नीशमन दलाने घटनास्थळी पोहचून पाण्याचा मारा केला व आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. ब-याच प्रयत्नांनी आग आटोक्यात आली. आगीत शाळा खोलीतील पाच लाकडी आलमा-या, जुने रेकॉर्ड तसेच क्रॉप सायन्सचे साहित्य, सहा शिलाई मशीनचे पायदान पूर्णपणे जळून खाक झाले. घटनास्थळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बाळकृष्ण कांबळे, अतिरिक्त आरोग्य अधिकारी राजेंद्र सांगळे, तहसीलदार रुपेश खंडारे यांनी भेट दिली. आग विझवण्यासाठी पालिकेचे सुधीर भालेराव, रुळे, संजय जाधव यांच्यासह अग्निशामक दलाच्या कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.