वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क
मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं (MPSC) यूपीएससीच्या (UPSC) धर्तीवर मोठा निर्णय घेतला आहे. यूपीएससीप्रमाणे खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना केवळ 6 वेळा परीक्षेला अर्ज करण्याची मुभा मिळणार आहे. 2021 पासून होणाऱ्या सर्व परीक्षांसाठी हा नियम लागू करण्यात येणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या निर्णयावर विद्यार्थ्यांच्या काय प्रतिक्रिया येतात हे पाहावे लागणार आहे. (MPSC limits exam attempt to Six times like UPSC)
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या निर्णयानुसार खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 6 वेळा परीक्षेला बसता येणार आहे.तर, अनुसूचित जाती आणि जमातीच्या उमदेवारांना परीक्षा देण्यासाठी मर्यादा घालण्यात आलेली नाही. इतर मागास प्रवर्गातील उमदेवारांना 9 वेळा एमपीएसीच्या परीक्षा देता येणार आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं यूपीएससीच्या धर्तीवर हा निर्णय घेतला आहे.
एखाद्या उमेदवारानं पूर्व परीक्षेला अर्ज केला आणि परीक्षेला बसला तर त्याचा अटेम्प्ट मोजला जाणार आहे. पूर्व परीक्षेनेंतर पुढील कोणत्याही टप्प्यावर उमेदवार अपात्र ठरल्यास त्याचा अटेम्प्ट गणला जाणार आहे.
2021 पासून नवे नियम लागू
महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं घेतलेला हा निर्णय आगामी 2021 मधील सर्व परीक्षांना लागू होणार आहे. एमपीएससी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी संख्या पाहता. लोकसेवा आयोगाच्या या निर्णयामुळे उमेदवारांची संख्या कमी होईल. परीक्षा देण्याच्या संख्येवर मर्यादा आणण्यचा आदेश एमपीएससीनं आज जारी केला आहे. आयोगाच्या निर्णयावर विद्यार्थ्यांच्या काय प्रतिक्रिया येतात ते पाहावे लागणार आहे.
राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलली
राज्यात कोरोनाबाधितांची संख्या आणि मराठा आरक्षणाच्या वादामुळे एमपीएसीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. 26 एप्रिल ते 10 मे रोजी नियोजित अनुक्रमे राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 आणि महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट – ब, संयुक्त पूर्व परीक्षा 2020 या अगोदर कोरोना मुळे पुढे ढकलली गेली.
मराठा संघटना आक्रमक
त्यानंतर मराठा आरक्षणाला स्थगिती दिली गेल्यानं मराठा संघटना आक्रमक झाल्या. परिणामी राज्यसेवा परीक्षा स्थगित करण्यात आली. राज्य सरकारनं मराठा समाजाला एसईबीसी प्रवर्गातून आरक्षण दिलं होतं. मात्र, सर्वोच्च न्यायालयानं मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाला स्थगिती दिली होती. त्यानंतर मराठा संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली.