व-हाड दूत न्युज नेटवर्क
बुलडाणा: कलह निर्माण झालेल्या संसारामध्ये सामंजस्य निर्माण करुन कुटुंबीयात विश्वास जागवण्याचे कार्य भरोसा सेलच्या माध्यमातून होत आहे. सेलच्या माध्यमातून विघ्न आलेल्या 76 जोडप्यांचा संसार पुन्हा थाटण्यात आला. वितुष्ट कमी करुन समेट घडवण्यात सेलला यश मिळाले.
घर म्हटले की कुरबुरी आल्याच. तसेच संसारात विघ्न येतात. त्याची तीव्रता वाढल्यास अनेकांच्या घरांची राखरांगोळी होते. हे विघ्न दूर करुन सलोखा जागावा म्हणून जिल्ह्यात भरोसा सेलची निर्मिती करण्यात आली आहे. सेलद्वारे पती-पत्नी मधील वाद सोडविण्यात यश मिळत आहे. शिवाय जे वाद मिटण्यासारखे नाही तसे वाद पोलिस स्टेशन व संबधित विभागाकडे वर्ग करण्यात येत आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील सासर व पतीकडून पीडित 399 महिलांनी भरोसा सेलकडे तक्रारी केल्या आहेत. त्यामधून 76 प्रकरणात समेट आणून त्यांचे संसार थाटले आहे.
पती-पत्नीतील संशय बळावणे, कुटुंबीयांचा अवास्तव हस्तक्षेप, व्यसन ही वादाची कारणे असतात. तसेच सध्या विभक्त कुटुंब पद्धती उदयास आली आहे. सासू, सास-यांबरोबर राहण्यात स्वारस्य नसते. अशा अनेक कारणांमुळे पती-पत्नीत वाद चव्हाट्यावर येतो. यामध्ये दोघांचा संसार तुटण्याच्या मार्गापर्यंत पोहचतो. हा वाद पोलिस स्टेशनपर्यंत पोहचतो.अन् कायद्यानुसार पोलिसही वाद आपसात करण्यासाठी किंवा योग्य मार्गदर्शनासाठी महिलांना भरोसा सेलकडे पाठवतात. तर काही पीडित महिला न्याय मिळविण्याकरिता भरोसा सेलकडे स्वत: दाद मागत असतात. भरोसा सेल मध्ये संसाराचे चाक रुळावर आणण्यासाठी पती-पत्नी व नातेवाईकांचे अधिकारी-कर्मचारी समुपदेशन करतात. शिवाय दोघांमधील वाद निपटवण्यासाठी दोन्ही कडील बाजू ऐकून प्रयत्न केला जातो.
मार्च ते आजपर्यंत 399 पैकी 76 तक्रारींचा निपटारा
8 मार्च, जागतिक महिला दिनापासून आजपर्यंत 399 तक्रारी दाखल झाल्या. आतापर्यंत 76 प्रकरणांचा निपटारा करुन त्यामध्ये समेट घडवण्यात आली आहे. कलम 498 मधील 47 प्रकरणे पोलिसात दाखल करण्यात आली होती. तर कौटुंबिक हिंसाचाराची 25 प्रकरणे, कोर्ट समन्सचे 20, दप्तरी फाईल 66 होत्या. त्यातील 232 तक्रारींचा निपटारा करण्यात आला आहे.
पीडित महिलांनी भरोसा सेलकडे तक्रार करावी
महिलांच्या तक्रारी असल्यास त्यांनी भरोसा सेलकडे कराव्यात त्यांना योग्य सल्ला दिला जाईल. या बाबत महिलांनी घाबरण्याचे कारण नाही, असे आवाहन भरोसा सेलच्या समुपदेशन अधिकरी अलका निकाळजे यांनी केले आहे.