बुलडाणा,(जिमाका) दि.3 : जिल्ह्यात जुलै, ऑगस्ट महीन्यात काही भागात अतिवृष्टी झाली. परिणामी शेतकऱ्यांचे नुकसान झाले. तसेच शेतांमध्ये नदीच्या पुराचे पाणी, धरणांमधून सोडलेले पाणी गेल्यामुळे पीके वाहून गेली. अशा परिस्थितीत पिक विमा काढलेल्या पात्र शेतकऱ्यांना पीक विम्याच्या मदतीचा लाभ देण्यात यावा. यामधून एकही नुकसानग्रस्त पात्र शेतकरी सुटता कामा नये, असे निर्देश पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात पीक विमाबाबतबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी व्यासपिठावर जिल्हाधिकारी षण्मुखराजन, अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पुरी आदी उपस्थित होते. बैठकीला जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक यांनी माहिती दिली.
नुकसानीमध्ये मूग पीकाचे 100 टक्के नुकसान झाले असल्याचे सांगत पालकमंत्री म्हणाले, पिक विमा काढलेल्या मूंग उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसानीचा सर्वे पूर्ण करावा. कृषी विभागाने याबाबत लक्ष घालून सर्वे पूर्ण करून घ्यावा. पात्र एकही शेतकरी मदतीपासून वंचित ठेवू नये. सर्वेमध्ये त्रुटी ठेवू नये. पोकरा योजनेत निवडलेल्या गावांमध्ये शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवाव्यात. तसेच या गावांमध्ये भेटी देवून तेथील शेतकऱ्यांचे समुपदेशन करावे. या योजनेचा लाभ शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत मिळवून द्यावा, अशा सूचनाही पालकमंत्री यांनी यावेळी दिल्या. बैठकीला उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, पीक विमा कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.