कृषी विद्यापीठात डॉ. पंजाबराव देशमुख यांची 122 वी जयंती उत्साहात साजरी
व-हाड दूत न्युज नेटवर्क
अकोला: कृषिप्रधान संस्कृती लाभलेल्या आपल्या देशातील शेतीला व्यवसायिकतेकडे अग्रेषित करण्यासाठी भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांनी केलेले कार्य युवा पिढीला प्रेरणादायी असून आधुनिक यंत्रे अवजारे, संकरित बियाणे, पशुधन आदींचा शेतीव्यवसायामध्ये अंतर्भाव करण्यासह शेतमालाला योग्य बाजार भाव प्राप्तीसाठी त्यांच्या आंतरिक भावना त्यांना खऱ्या अर्थाने कृषी क्रांतीचे प्रणेते सिद्ध करतात असे गौरवपूर्ण वक्तव्य महात्मा फुले महाविद्यालय वरुड चे प्राध्यापक डॉ.राजेश मिरगे यांनी केले.
विस्तार शिक्षण संचालनालय डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला द्वारे डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या 122 व्या जयंतीनिमित्त आयोजित जयंती कार्यक्रम प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. शेतकऱ्यांचे सर्वांगीण विकासासाठी चौदा कलमी कार्यक्रमाची योजना तयार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी भाऊसाहेबांनी केल्याचे सांगत भाऊसाहेबांचे राजकीय, अर्थविषयक, सामाजिक, शैक्षणिक, कृषीविषयक योगदान अधोरेखित केले, आपल्या अतिशय अभ्यासपूर्ण मार्गदर्शनात प्रा. मिरगे यांनी आपल्या ओघवत्या वाणीने उपस्थितांच्या मनाचा ठाव घेतला.
तत्पूर्वी कार्यक्रमाचे आयोजक संचालक विस्तार शिक्षण डॉ.दिलीप मानकर यांनी आपल्या प्रास्ताविकात जयंती कार्यक्रमाचे योजनाची पार्श्वभूमी विशद केली. दरवर्षी यानिमित्ताने राज्यस्तरीय भव्यदिव्य कृषी प्रदर्शनीचे आयोजन विद्यापीठाद्वारे करण्यात येते तथापि यंदा covid-19 महामारी च्या पार्श्वभूमीवर सदर प्रदर्शनी घेता येत नसल्याची खंत सुद्धा डॉ मानकर यांनी व्यक्त केली. याप्रसंगी विशेषत्वाने उपस्थित विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सन्माननीय सदस्य मा.आ. गोपीकिशन बाजोरिया यांनी विद्यापीठाच्या वाटचालीबाबत समाधान व्यक्त करत राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन ॲग्रोटेक चा गौरवाने उल्लेख केला व यंदा covid-19 च्या प्रादुर्भावामुळे राज्यस्तरीय प्रदर्शनी आयोजित करता येत नसल्याचे शल्य न बाळगता पुढील काळात राष्ट्रीय पातळीवरील कृषी प्रदर्शनी आयोजित करण्यासाठी आग्रहाची भूमिका घेईल असा आशावाद व्यक्त केला.
भाऊसाहेब पंजाबराव देशमुख साहेबांचे संकल्पने नुसार शेती विकास साधण्यासाठी कृषी विद्यापीठ कार्यशील:- कुलगुरू डॉ. विलास भाले
भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांचे नावाचे पावित्र्य जतन करत आधुनिक शेती विषयक शिक्षण, संशोधन आणि कालसुसंगत विस्तार कार्याचे माध्यमातून “व्यावसायिक व शाश्वत शेतीसह समृद्ध शेतकरी” या कार्यप्रणाली वर अधिकाधिक भर देत विद्यापीठाची वाटचाल सुरू असल्याचे आश्वासक प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी केले. शेती व्यवसायाला उपलब्ध संसाधनावर आधारित जोडधंद्याची साथ असल्यास उत्तम शेतीची संकल्पना कृतीत येते याचा उल्लेख करत डॉ. भाले यांनी शेतीपूरक व्यवसायाचे महत्त्व सुद्धा आपल्या संबोधनात अधोरेखित केले.
प्रगतिशील शेतकरी तथा कार्यकारी परिषद सदस्य श्री गणेश कंडारकर यांनी शेती आणि शेतकरी वर्गाच्या समस्या मांडत विद्यापीठाकडून तांत्रिक मार्गदर्शन उपलब्ध होत असल्याबद्दल गौरवोद्गार काढले व भाऊसाहेबांचे स्वप्नातील शेती आणि शेतकरी घडविण्यासाठी विद्यापीठाची भूमिका अभिनंदनीय असल्याचे सांगत विद्यापीठात आलेल्या शेतकऱ्यांना कृषी ज्ञानाची शिदोरी प्राप्त होत असून शेतकरी बंधू-भगिनींनी कृषी विद्यापीठाच्या मार्गदर्शनाचा फायदा करून घ्यावा असे आवाहनही याप्रसंगी केले तरच भाऊसाहेब पंजाबराव देशमुख म्हणजे विदर्भाचे हृदयसम्राट असून ते सामाजिक परिवर्तनाचे नायक असल्याचे प्रतिपादन विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्य श्री मोरेश्वर वानखेडे यांनी आपल्या संबोधन केले. भाऊसाहेबांच्या जीवन कार्याचा अभ्यासपूर्ण लेखाजोखा मांडतांना श्री वानखेडे यांनी भाऊसाहेबांचे शैक्षणिक कृषिविषयक तथा सामाजिक कार्याचा परिचय उपस्थितांना करून दिला.
याप्रसंगी शेतकऱ्यांची ग्रामगीता “कृषी संवादिनी 2021” चे तथा “विद्यापीठ कृषी दिनदर्शिका 2021” चे विमोचन मान्यवरांचे शुभहस्ते करण्यात आले. covid-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर किसान बायोटेक हब अंतर्गत दत्तक गावातील 50 शेतकरी बंधू भगिनींचे उपस्थित संपन्न झालेल्या या अतिशय भावनाप्रधान कार्यक्रमाची सुरुवात कृषी क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेला माल्यार्पण तथा दीप प्रज्वलनाने झाली.
कार्यक्रमाचे प्रसंगी विद्यापीठाचे कार्यकारी परिषद सदस्य श्री विनायक सरनाईक, संचालक शिक्षण डॉ. महेंद्र नागदेवे, संचालक संशोधन डॉ. विलास खर्चे, अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी डॉ. सुधीर वडतकर, अधिष्ठाता उद्यानविद्या डॉ.प्रकाश नागरे, कुलसचिव डॉ. सुरेंद्र काळबांडे, विद्यापीठ नियंत्रक श्री जगदीश मानमोठे,विद्यापीठ अभियंता श्रीमती रजनी लोणारे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती लाभली होती. सूत्रसंचालन विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे यांनी तर आभार प्रदर्शन मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ नारायण काळे यांनी केले. याप्रसंगीआयोजित तांत्रिक सत्रामध्ये “हरभरा पिकातील घाटे आळी चे व्यवस्थापन” विषयावर डॉ. प्रेरणा चिकटे यांनी तर “सेंद्रिय बोंड आळी बंदोबस्तासाठी कापूस पिकाच्या फरदडीचे व्यवस्थापन” या विषयावर विस्तार कृषी विद्यावेत्ता डॉ. विनोद खडसे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तांत्रिक सत्राचे सूत्रसंचालन तथा आभारप्रदर्शन मुख्य संपादक प्रा. संजीवकुमार सलामे यांनी केले.