वर्हाड दूत न्यूज नेटवर्क
अकोला: दरवर्षी प्रमाणे याही वर्षी अकोला जिल्ह्यात कुटुंब नियोजन कार्यक्रमाचे (फॅमिली प्लानिंग) तीनतेरा वाजले आहेत! यासाठी यापूर्वी इतर बाबींना कारणीभूत धरण्यात आले, आता मात्र याचे संपूर्ण खापर कोरोनावर फुटले आहे. जिल्ह्यात या वर्षारंभी काही प्रमाणात कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया झाल्या, अर्थातच त्यामध्ये महिला आघाडीवर होत्या, नेहमीप्रमाणेच पुरूषांनी याकडे पाठ फिरविल्याचे आढळून आले. एप्रिल महिन्यातच कोरोनाने जिल्ह्यात शिरकाव केल्याने तेव्हापासून आजतागायत जिल्ह्यात कोठेही कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी शिबीर घेणे शक्य नसल्याने या वर्षअखेरीपर्यंत शहरी आणि ग्रामीण भागात पुरूषांच्या बिनटाका एनएसव्ही शस्त्रक्रिया शून्य असल्याची माहिती हाती आली आहे.
दरवर्षी संपूर्ण राज्यात प्रत्येक जिल्ह्याला कुटुंब नियोजनाचे लक्ष्य (टार्गेट) देण्यात येते. अकोला जिल्ह्यासाठी यावर्षी बिनटाका एनएसव्ही 674 शस्त्रक्रियांचे लक्ष्य देण्यात आले होते. त्यामध्ये ग्रामीण भागासाठी 421 आणि शहरी भागासाठी 253 श्स्त्रक्रियांचे नियोजन होते. कोरोनामुळे मात्र यावर्षी कुटुंब नियोजनासाठी एकही शिबीर लावण्यात आले नाही, परिणामी एकही शस्त्रक्रिया होवू शकली नाही. सूत्रांनी सांगितले, की शहरी भागात महिलांच्या (टाका अबडॉमीनल) 254 शस्त्रक्रिया झाल्यात. जिल्ह्यात महिलांच्या एकूण 7423 शस्त्रक्रियांचे लक्ष्य होते, त्यापैकी 1377 शस्त्रक्रिया कोरोनाच्या आगमनापूर्वी पार पडल्या आहेत. त्याची टक्केवारी केवळ 17 टक्के आहे. जिल्ह्यात दोन अपत्यांवर 795 महिलांनी शस्त्रक्रिया केल्या आहेत. ही टक्केवारी एकूण टार्गेटच्या केवळ 15 टक्के आहे. यावरून जिल्ह्याच्या एकंदरीत कामगिरीची कल्पना यावी. पुरूषांच्या शस्त्रक्रियांचा तर प्रश्नच उद्भवला नाही कारण नेहमीप्रमाणे त्यांनी याकडे पाठ फिरविली आहे.
अकोला जिल्हा कुटुंब नियोजन शस्त्रक्रियांच्या बाबतीत दरवर्षी माघारलेलाच आढळून आला आहे. आतापर्यंत जिल्ह्याने 65 टक्केवारीच्या वर कधीच मजल मारलेली नाही. मध्यंतरीही चिकनगुनियाने या शस्त्रक्रियांवर असाच प्रभाव टाकला होता तर आता कोरोनाने!