वर्हाड दूत न्यूज नेटवर्क
शेगाव : स्थानिक पंचशिलनगर येथील रहिवासी 49 वर्षीय शेतकरी महिलेने रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना काल सकाळच्या सुमारास घडली.लोहमार्ग पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी मृतक महिलेची ओळख पटविली असून मृतक महिला नामे श्रीमती सरला भिकाजी कोकाटे ही स्थानिक पंचशिल नगर येथील रहिवासी होती. पोलिसांनी या प्रकरणी मर्ग दाखल केला असून पुढील तपास पोहेकॉ भास्कर दामोदर हे करीत आहेत.
पिककर्ज मंजूर न झाल्याने आत्महत्या केल्याचा आरोप
मृतक महिला ही घरातील कर्ती होती. त्यामूळे शेतीची सर्व कामे त्यांच्याकडेच होती. यावर्षी पिकांची नासाडी झाल्याने शेतीमधून काहीही उत्पन्न झाले नाही शिवाय त्यांनी स्थानिक स्टेट बँकेच्या शाखेत पिक कर्जासाठी अर्ज केला असताना बँकेत वारंवार चकरा मारूनही त्यांना पिक कर्ज मिळाले नाही. त्यामूळे नैराश्यापोटी त्यांनी रेल्वेखाली आत्महत्या केल्याचा आरोप मृतक महिलेचा मुलगा अमोल भिकाजी कोकाटे याने केला असून पोलिसांनी या दिशेनेही या घटनेचा तपास करावा अशी मागणी वजा विनंती तपास अधिकार्यांना केली आहे.