वर्हाड दूत न्यूज नेटवर्क
खा. संजय राऊत यांच्या वक्तव्यावर भाजपा जिल्हाध्यक्षांची टिका
अकोला:’पहिले मंदिर, फिर सरकार’ असे बोलणा-यांची भाषा आता सरकार आल्यावर बदलली आहे, म्हणूनच संजय राऊत राम मंदिर राजकारणापासून दूर ठेवायले हवे अशी भाषा करीत आहेत. राममंदिरासाठी वर्गणी गोळा करण्यात येत आहे, खंडणी नव्हे असे ठणकावून सांगतानाच, आपणच लोक असल्याचा आव कोणी आणू नये, कारण आपण म्हणजे लोक नाही. मुंबईकर नाही व महाराष्ट्रही नाही, त्यामुळे तुम्ही आधी या भ्रमातून बाहेर या, असा मार्मिक टोला भाजप जिल्हाध्यक्ष तथा आमदार रणधीर सावरकर यांनी खा. संजय राऊत यांना लगावला आहे.
शिवसेना नेते खा. संजय राऊत यांच्या वक्तव्याचा सावरकरांनी खरपूस समाचार घेतला. भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर म्हणाले, की शिवसेनेने हिंदुत्व सोडल्यामुळेच ते असे बोलत आहेत. वर्गणी आणि शिवसेना यांचा संबंध फार जुना आहे. शिवसेनेचे अनेक सामाजिक उपक्रम, कार्यक्रम या वर्गणीच्या माध्यमातून व्हायचे. मुंबई व राज्यातील शिवसेनेच्या अनेक शाखांचे निर्माणही याच वर्गणीतून झाले आहे. त्यामुळे वर्गणी हे काय प्रकरण असे म्हणणा-या राऊतांचे वक्तव्य म्हणजे येड्याचे सोंग घेऊन पेडगावला जाण्यासारखे आहे. जशी शिवसैनिकाची नियुक्ती हाेत नसते. तशी स्वयंसेवकाचीही नियुक्ती होत नसते. तर स्वयंसेवक हा राष्ट्रभक्तीचा एक अविष्कार आहे. देशभक्तीसाठी उत्स्फूर्त काम करणारा स्वयंसेवक असतो. राष्ट्रवादी विचाराने प्रेरित झालेला असा हा कडवट कार्यकर्ता हा स्वयंसेवक आहे. चार लाख स्वयंसेवक घरोघरी जाऊन प्रचार करणार असतील तर त्याचे दु:ख राऊत यांना होण्याचे कारण नाही. स्वयंसेवक जर घरोघरी जाऊन वर्गणीच्या माध्यमातून राममंदिर उभारणीसाठी काही योगदान देणार असतील, तर ती आनंदाची गोष्ट आहे. ज्यांनी राममंदिरासाठी रक्त सांडले त्यांचा यामुळे अपमान होईल, हे राऊत यांचे विधान अतिशय हास्यास्पद आहे.