व-हाड दूत न्युज नेटवर्क
बाळापूर:सामाजिक नेतृत्वात मराठा हॉटेलचे मुरलीधर राऊत यांना दानशूर म्हणून ओळखले जाते. कित्येक गोरगरिबांना त्यांच्या संकटात, हलाखीच्या काळात जगण्याची उमेद राऊत यांच्या दातृत्वाने नेहमीच जिवंत ठेवली आहे. सामाजिक सेवेचा वसा जोपासलेल्या मुरलीधर राऊत यांनी महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या लेकीच्या लग्नाची जबाबदारी स्वीकारून समाजात एक खुप मोठा आदर्श निर्माण केला आहे.
महाराष्ट्रात शेतक-यांच्या आत्महत्येचा आकडा वाढत असून परिस्थिती समोर बळीराजाचे कुटुंब हतबल होत आहे. अशा हतबल झालेल्या आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबीयांची कनव जाणत त्यांना मानसिक आधार देत खंबीरपणे उभे करण्यासाठी राऊत यांनी पावले उचलली आहेत.
बाळापूर तालुक्यातील शेळद येथील मुरलीधर राऊत यांचे राष्ट्रीय महामार्गावर मराठा नावाचे हॉटेल आहे. या हॉटेलचे संचालक मुरलीधर राऊत यांनी नोटा बंदीच्या काळात प्रवाशांना मोफत जेवण देत आपल्या दातृत्वाचा परीचय दिला होता. त्यानंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदीच्या काळात अडकलेल्यांना मोफत जेवण उपलब्ध करून दिले होते.
आता त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलींच्या विवाहासाठी ते समोर आले आहेत. मुलीकडील पाहुण्यांच्या जेवणासह हॉल व लॉनची मोफत व्यवस्था राऊत यांनी मराठा हॉटेलवर केली आहे. त्यामुळे शेतक-यांच्या कुटुंबांसाठी ते जणू देवदूतच ठरले आहेत. मुरलीधर राऊत हे स्वतः शेतकरी असून त्या नात्याने व कर्तव्याप्रती जाण ठेवून त्यांनी धाडसी पाऊल उचलले आहे. त्यांच्या या उपक्रमामुळे आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या मुलींच्या विवाहाची चिंता मिटली आहे.
टाळेबंदीच्या काळात लावले बारा लग्न
कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अनेक व्यवसाय ठप्प झाले होते तर आर्थिक स्थितीही ढासळली असताना मुरलीधर राऊत यांनी आपले हॉटेल खुले करत या हॉटेलात तब्बल बारा विवाह पार पाडले. अन तेही कुठलेही भाडे न आकारता.
मन की बात मध्ये कार्याची दखल
नोटाबंदीच्या काळात प्रवाशांना त्रास होऊ नये म्हणून पैसे नसतील तरीही जेवण करा व नंतर आणून द्या! अशी उधारीची सवलत उदार मनाने राऊत यांनी प्रवाशांना दिली होती. या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात मधून केले होते.