व-हाड दूत न्युज नेटवर्क
अकोला: गावामध्ये दारूबंदी व्हावी म्हणून बार्शीटाकळी तालुक्यातील शेलगाव येथील महिलांनी पुढाकार घेत, थेट हातभट्टीची दारू विक्री करणा-या व्यक्तींच्या घरात घुसून दारूसाठा उध्वस्त केला. पोलिसांच्या आशीर्वादाने गावात दारू विक्री होत असल्याचा आरोप महिलांनी केला आहे.
अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करून निवेदन सादर केले होते. मात्र याचाही काही परिणाम न झाल्याने अखेर शेलगाव येथील महिलांनी दुर्गेच रूप धारण करत , अवैध दारूविक्री करणा-यांच्या घरात घुसून दारूसाठा नष्ट केला. अवैध दारूवर आळा बसावा म्हणून शासनाने स्वतंत्र दारूबंदी खात उघडलं आहे. परंतु या विभागाचं ग्रामीण भागात दुर्लक्ष असल्याने, ग्रामीण भागातील संसार दारूमुळे उध्वस्त होत आहेत. संसार उध्वस्त होत असल्याने अखेर या महिलांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचे दिसून येते. महिला वर्ग दारू पकडून पोलिसांना बोलवतात परंतु दुस-याच दिवशी ‘जैसे थे’ दारू विकणे सुरूच असते. विक्रेत्यांना पोलिसांचेच पाठबळ असल्याचा आरोप महिलांनी केला आहे. जंगल जवळ असल्याने संपूर्ण दारू अड्डे बोरामळी शेलगाव जंगल व नाल्याने दारू अड्डे आहेत. त्यासाठी लागणारे लाकूड सुद्धा त्यांना सहज उपलब्ध होते. या आंदोलनात वर्षा पवार, कविता जाधव, आशा जाधव, रेणुका जाधव, शारदा राठोड, इंदू राठोड, मीरा जाधव, सरस्वती पवार, अरुणा पवार, अनुसया राठोड, लाली पवार, संगिता पवार, पुष्पा पवार, सुषमा जाधव, बबीता पवार, लक्ष्मी पवार, अंजली पवार, लता चव्हाण, शोभा पवार अनिता पवार, अन्नपूर्णा आडे, शंतनू आडे, कांताबाई पवार आदींनी सहभाग घेतला. याप्रकाराची माहितीही महिलांनी पोलिसांना फोनवरून देत यापुढेही दारू विक्रेत्यांवर आता आम्हीच कारवाई करू असा इशारा दिला आहे.