गृहमंत्री करणार मानस कन्येचे कन्यादान
रविवारी नागपुरात लग्नसोहळा
व-हाड दूत न्युज नेटवर्क
नागपूर: बाबुल की दुवाँये लेती जा…. जा तुझको सुखी संसार मिले… असा आशीर्वाद एका मानस कन्येला गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कडून मिळत असेल तर..आणखी काय पाहिजे.!
हे काही चित्रपटाचे कथानक नसून वास्तव आहे. मतीमंद व मुकबधीर अनाथ मुलांच्या संगोपनासोबतच पुनर्वसनासाठी कार्य करणारे ज्येष्ठ समाजसेवी शंकरबाबा पापडकर यांची मानस कन्या कु. वर्षा शंकरबाबा पापडकर व अनाथालय बालगृहातील समीर यांचा विवाह संपन्न होत आहे. या विवाहात कु. वर्षा हिचे कन्यादान वधुपिता-माता म्हणून गृहमंत्री अनिल देशमुख व सौ. आरती देशमुख करणार आहेत.
अमरावती जिल्ह्यातील वझ्झर येथे स्व. अंबादासपंत वैद्य मतीमंद, मुकबधीर अनाथालय येथे 23 वर्षापूर्वी नागपूर रेल्वे स्टेशनवर बेवारस अवस्थेत पोलीसांना सापडलेल्या मुलीचे संगोपन करुन चिमुकलीचा तिचा आईवडीलाप्रमाणे सांभाळ करुन तिला वडीलाचे नाव दिले. ती सहा वर्षाची झाल्यानंतर शिक्षणाकरीता संत गाडगेबाबा निवासी मुकबधीर विद्यालय येथे चौथीपर्यंत शिक्षण देवून स्वत:च्या पायावर उभे केले. तर डोंबिवली येथे बेवारस स्थितीत सापडलेल्या दोन वर्षाच्या समीरचे सुध्दा वझ्झर येथील अनाथालयात शंकरबाबा पापडकरांनी स्वत:चे नाव देवून सांभाळ केला. सातव्या वर्गापर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर स्वावलंबी जीवन जगता यावे यासाठी नोकरी मिळवून दिली.
श्री. देशमुख यांच्या नागपूर निवासस्थानी त्यांच्या सुनबाई सौ. रिध्दी देशमुख यांनी नव वधु वरांचे स्वागत व औक्षण करुन लग्नसोहळयाच्या पूर्व विधींची सुरुवात केली.
जिल्हाधिकारी वरपिता
मुकबधीर असलेल्या समीर याच्या वरपित्याची जबाबदारी जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे व सौ. ज्योत्स्ना ठाकरे यांनी स्वीकारली आहे. रविंद्र ठाकरे व सौ. ज्योत्सना ठाकरे यांनी आज समीर व वर्षा यांना विशेष निमंत्रित केले.
बालगृहातील कु. वर्षा सोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर शंकरबाबांनी स्वतंत्र घर तसेच पुढील पुनर्वसनाच्या दृष्टीनेसुध्दा स्वावलंबी केले. त्यानंतरच दोघांच्या विवाहाला समंती दिली.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बालगृहाला भेट दिली असता दोघांच्या विवाहाचा प्रस्ताव ठेवून संमती मिळाल्यानंतर कन्यादान करण्याचे त्यांनी मान्य केले. हा विवाह ‘सदभावना लॉन’ सीआयडी ऑफिस समोर पोलिस लाइन टाकळी नागपूर येथे 20 डिसेंबर 2020 रोजी सायंकाळी 5.00 वाजता संपन्न होणार आहे. कोरोना संदर्भात राज्य सरकारने ज्या अटी घालून दिलेल्या आहेत त्या अटींना पाळून या विवाह सोहळ्यात नागरिकांनी उपस्थित राहून वधूवरांना शुभ आशीर्वाद द्यावेत असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे. जर या मूकबधिर दांपत्यास संसारोपयोगी साहित्य दिले तर मला आनंदच होईल असे मत सुद्धा यावेळी अनिल देशमुख यांनी व्यक्त केले.